जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांत शिक्षकच नाही, शिक्षण समितीत पडसाद
By गणेश हुड | Published: June 8, 2023 02:42 PM2023-06-08T14:42:42+5:302023-06-08T14:45:28+5:30
शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. तर ५१ शाळांतशिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थित शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा कसा करू शकतो. असा सवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक बुधवारी सभापती राजू कुसुंबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान, सदस्या शांता कुमरे यांनी त्यांच्या सर्कलमध्ये २५ शिक्षकांची कमतरता असल्याने नाराजी व्यक्त केली. आपले सर्कल दुर्गम भागात असताना प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते; परंतु शिक्षक भरतीचे कारण पुढे केले जाते. त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्याथ्यांना बसतो आहे.
एकीकडे शाळेतील पटसंख्या कमी होत असताना जिथे चांगली पटसंख्या आहे, तिथे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांयांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार? असा सवाल त्यांनी केला. शासन जोपर्यंत शिक्षकभरती करणार नाही, तोपर्यंत कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या करा, यासाठी १.५० कोटींची तरतूद करण्याची मागणी सदस्यांनी केली.
अशी आहेत रिक्त पदे
तालुका - रिक्त पदे
रामटेक - १९३
पारशिवनी - ५७
नरखेड - १०८
मौदा - ११०
एकही शिक्षक नसलेल्या शाळा
तालुका - शाळा
हिंगणा - ३
कळमेश्वर - २
मौदा - ५
उमरेड - ४
भिवापूर - ४
नरखेड - ९
काटोल - ४
रामटेक - ४
सावनेर - ४
कुही - ९
पारशिवनी - ३