रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या गेटवर तिकिट तपासणारेच नाहीत; अप्रिय घटना होण्याचा धोका
By नरेश डोंगरे | Published: July 20, 2023 11:33 PM2023-07-20T23:33:21+5:302023-07-20T23:34:34+5:30
प्रवासी यात्री संघाने वेधले लक्ष
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या नागपूररेल्वे स्थानकावर सुरक्षा कशी आणि किती मजबूत आहे, याचे उत्तर येणारा काळ देणार असला तरी या रेल्वे स्थानकावर रात्री कुणीही कुठूनही बिनधास्त येऊन शहरात दाखल होऊ शकतात, अशी स्थिती आहे. होय, हे खरे आहे. कारण रात्रीच्या वेळी या रेल्वेस्थानकावरील काही गेटवर तिकिट तपासणारी मंडळीच दिसत नाही. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर भारतीय यात्री केंद्राने या संबंधाने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
मध्य भारतातील एक महत्वाचे आणि मोठे रेल्वे स्थानक म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाचे नाव देशात आहे. या स्थानकावरून २४ तास देशाच्या चारही भागात रेल्वेगाड्या जात येत असतात. या रेल्वेस्थानकाला यापूर्वी उडवून देण्याची धमकी दहशतवादी संघटनांनी दिली असून, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून नेहमी अलर्टही दिला जातो. हा झाला घातपाताच्या धोक्याचा भाग. दुसरे म्हणजे, रोज हजारोंच्या संख्येत येथून प्रवासी येणे-जाणे करतात. त्यामुळे चोर भामटेही नेहमीच येथे सक्रिय असतात. मोठ्या प्रमाणावर विविध भागातून नागपुरात अंमली पदार्थही येते. असे सर्व असताना येथील चेकिंग स्टाफ कमालीचा हलगर्जीपणा दाखवत असल्याचे आता उघड झाले आहे.
प्रवासी यात्री संघाचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी या संबंधाने एक तक्रार वजा निवेदन रेल्वेच्या वरिष्ठांना दिले आहे. सोबत फोटोही जोडले आहे. या तक्रारीनुसार, रात्री १० वाजता नंतर रेल्वे स्थानकाच्या बहुतांश प्रवेश आणि निकासी गेटवर टीसीच नसतात. एकीकडे महिला टीसी रात्री गेटवर राहत नाही त्यामुळे अनेक फुकटे, विनातिकिट प्रवासी लेडिज एसी वेटिंग हॉलमध्ये आराम करीत असतात, असा आरोप आहे. पुरूष टीसी अथवा आरपीएफचे जवान लेडिज वेटिंग हॉलमध्ये जाऊन चाैकशी करू शकत नाही. त्यामुळे एखाद दिवशी कुण्या समाजकंटकाकडून येथे मोठी अप्रिय घटना घडविण्याचा धोका आहे.
सुरक्षा धोक्यात : शुक्ला
भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांच्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्थानकावर सुमारे ४० लेडिज टीसीं कार्यरत आहेत. अशात रात्रीच्या वेळी टीसी उपस्थित नसणे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. यामुळे येथे चोरीसारखे गुन्हे घडण्याची तर शक्यता आहेच. यामुळे महिलांचीही सुरक्षा धोक्यात येते. दुसरे कोणते समाजकंटक येथे कसलाही धोका करू शकतात. त्यामुळे वरिष्ठांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.