मतदारयाद्याच नाहीत, मग निवडणुकीची घाई का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 08:33 PM2020-11-03T20:33:29+5:302020-11-03T20:35:48+5:30
Chandrakant Patil, media, Nagpur news
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका मार्च महिन्यात होतील, असे वाटले होते. इतक्या लवकर त्यांची घोषणा अपेक्षित नव्हती. अद्याप मतदार याद्यांची घोषणा व्हायची आहे. अशास्थितीत निवडणुकीची घाई का करण्यात आली, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा एकूण कार्यक्रम हा साधारणत: ४५ दिवसाचा असतो. मात्र निवडणूक आयोगाने केवळ २५ दिवसाचाच कार्यक्रम घोषित केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नऊ जिल्हे येतात. १३ तारखेला नामांकन अर्जाची छाननी झाल्यानंतर केवळ १७ दिवसात इतक्या जिल्ह्यात संपर्क कसा करणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही निवेदन देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
राज्यात आणीबाणी आहे असेच घोषित करा
राज्यात सत्तेत असलेल्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काहीही म्हटले तरी ते चालते. पण तुम्हाला मात्र कुणीच काही म्हणायचे नाही. असे असेल तर एकदाचे घोषितच करा की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. राज्यातील जनता दंडुकेशाही सहन करणार नाही, या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
सरकारकडून मराठा आणि ओबीसीत वाद लावण्याचा प्रयत्न
आमची सत्ता असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले होते. आम्ही न्यायालयातदेखील आरक्षण टिकविले. मात्र महाविकास आघाडीला ते करता आले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी त्यांची गत झाली आहे. जातीयवाद निर्माण करून सरकार चालविणे हेच त्यांचे धोरण आहे. सरकारकडूनच ओबीसी व मराठ्यांमध्ये वाद लावण्यात येत आहे. मंत्री असलेले विजय वडेट्टीवार हेच दररोज ओबीसींच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लावला.
मिठागरावर घाला घालण्याचाच प्रकार
कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड जेथे उभारणार आहे ती मिठागाराची जागा आहे. मिठागरे संपल्याने पर्यावरणाला धोका आहे. मुळात ती केंद्राची जागा आहे. आम्ही २०१५ मध्ये गरिबांच्या घरांसाठी पर्यावरणाच्या कारणामुळेच ती मिळाली नव्हती. सत्ताधारी आरेचे जंगल वाचवायला निघाले होते. मात्र दुसरीकडे ते मिठागारावर घाला घालत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.