लाखाच्या संख्येत असणाऱ्या धानाच्या प्रजाती आता अवघ्या ६ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:23 AM2021-05-26T07:23:40+5:302021-05-26T07:24:42+5:30
Nagpur News सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी देशात धानाच्या १ लाख १० हजार प्रजाती होत्या. मात्र आता यातील अनेक नामशेष झाल्या असून असून देशभरात अवघ्या ६ हजारांपर्यंतच धानाच्या देशी जाती अस्तीत्वात आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी देशात धानाच्या १ लाख १० हजार प्रजाती होत्या. मात्र आता यातील अनेक नामशेष झाल्या असून असून देशभरात अवघ्या ६ हजारांपर्यंतच धानाच्या देशी जाती अस्तीत्वात आहे. यामुळे या जातींचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन न झाल्यास निसर्गाच्या मोठ्या अलौंकिक देणगीला मुकण्याची वेळ माणसावर येण्याची शक्यता आहे.
१०७०-७५ च्या दशकात संकरित बियाण्यांची पद्धत नव्हती. सर्व प्रकारचे देशी वाण शेतामध्ये पिकवले जायचे. मात्र हरित क्रांतीनंतर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. देशाच्या कृषी उत्पादकता वाढीवर भर दिला गेला. नवे वाण संशोधनासोबतच देशात प्रयोगाशाळा उभ्या झाल्या. कृषी विद्यापिठांमधून संशोधित वाण बाहेर आल्याने शेतकरी नव्या वाणाकडे वळले. देशामध्ये रोजच्या जेवणात भाताचा वापर अधिक आहे. सध्या महाराष्ट्रात विदर्भ व कोकणसह, अन्य राज्यात फक्त ५ ते ६ हजार धानाच्या जाती उरल्या आहेत.
विदर्भात उरल्या २० जाती
विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिलह्यांमध्येही पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे तांदुळ पिकविले जायचे. मात्र आता विदर्भात फक्त २० जाती उरल्या आहेत. यात लुचई, पांढरी लुचई, पिवळी लुचई, काली कम्मोर, हिरानथी (तुळशीमंजुळा), दुबराज, काटेचिन्नोर, चिन्नोर, बासगिरा, गुरूमुखिया, लिलावती, काला भात, रक्तसाळ आदी जाती उरल्या आहेत. २०१४ पासून देशी वाण संकलित करण्याच्या महाराष्ट्र जनकोष प्रकल्पांच्या माध्यमातून उपक्रमाला चालना मिळायला लागल्याने काही मोजके शेतकरी या वाणांच्या लागवडीकडे आणि संवर्धनाकडे वळले आहे.
जीएमओने आणली गदा
मुळ वाणावर संशोधन करून नवे संकरित वाण बाजारात आणल्याने व त्याची उत्पदकता अधिक असल्याने शेतकरी मुळ वाणाला विसरले. जीएमओ अर्थात जणुकिय परावर्तीत पिके (जेनेटिकली मॉडिफाईट सीड्स) घेण्याकडे कल वाढला. सरकारकडून आणि बियाणे विक्रेत्या कंपन्याकडूनही यासाठी शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळायला लागल्याने नव्या संकरित वाणाचा वापर वाढला. पूर्वी प्रचलित असणारे वाण कमी उत्पादकतेचे होते. मात्र त्यात नैसर्गिक घटक, खनिजे होती. परंतु अधिक उत्पादकतेच्या हव्यासामुळे देशी वाण मागे पडले. कालांतराने नामशेष झाले.
प्रत्येंक धानाची वेगळी गुणवैशिष्ठ आहेत. नैसर्गिक खनिजे, घटक त्यात मुलत: आहेत. मुळ जाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका आहे. सध्या तयार झालेल्या संकरित आणि संशोधित जाती मुळ जातींवर तयार झाल्या आहेत. कालांतराने मुळ जाती नष्ट झाल्यास पर्यावरण आणि निसर्गाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
- सुधीर धकाते, कृषी अभ्यासक, भंडारा
...