कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नाची ‘गडबड’; सहमतीशिवायच प्रश्नात आमदारांची नावे

By योगेश पांडे | Published: December 13, 2023 07:06 AM2023-12-13T07:06:38+5:302023-12-13T07:07:05+5:30

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेतील एका प्रश्नावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

There are signs of controversy over a question in the Legislative Council's question-and-answer booklet | कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नाची ‘गडबड’; सहमतीशिवायच प्रश्नात आमदारांची नावे

कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नाची ‘गडबड’; सहमतीशिवायच प्रश्नात आमदारांची नावे

योगेश पांडे

नागपूर : विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेतील एका प्रश्नावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीकरण न करण्याबाबत असलेल्या प्रश्नात सहमतीशिवाय आमची नावे टाकण्यात आली असल्याचा दावा तीन सदस्यांनी केला आहे. परस्परच त्यांची नावे प्रश्नपुस्तिकेत आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, ही प्रणालीतील चूक आहे की यामागे इतर काही राजकारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंगळवारच्या प्रश्नपुस्तिकेत ३९व्या क्रमांकाचा प्रश्न या मुद्द्यावर होता. त्यात सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, वजाहत मिर्झा, भाई जगताप, सतेज पाटील, राजेश राठोड, डॉ. प्रज्ञा सातव, धीरज लिंगाडे, जयंत आसगावकर यांची नावे होती. शासनातर्फे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी लेखी उत्तरदेखील दिले. मात्र ही पुस्तिका वाचल्यावर तीन आमदारांना धक्काच बसला. भाई जगताप, सतेज पाटील व जयंत आसगावकर यांनी या प्रश्नाबाबत कुठलीही सहमती दिली नव्हती किंवा स्वाक्षरीदेखील केली नव्हती. राजकीयदृष्ट्या या प्रश्नाचे महत्त्व लक्षात घेता तिघांनीही तातडीने विधिमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून या प्रकाराची माहिती दिली.

आम्हाला तिघांनाही या प्रश्नाची कुठलीही कल्पना नव्हती व सहमती नसताना नावे जोडण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्नातील नावे वगळावी, अशी मागणी तिघांनीही पत्रातून केली. याबाबत सतेज पाटील यांना ‘लोकमत’ने विचारणा केली असता त्यांनी असा प्रकार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अनेकदा आमदार इतर सदस्यांची परस्पर नावे टाकतात. या प्रश्नात नेमकी काय गडबड झाली आहे हे अधिकारी तपासतील असे ते म्हणाले.

प्रश्नांसाठी असते ‘संगणकीय प्रणाली’

तिन्ही सदस्यांनी त्यांच्या स्वाक्षरीशिवाय प्रश्नात नाव आल्याचा दावा केला आहे. याबाबत सचिव जितेंद्र भोळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तारांकित प्रश्नांसाठी संगणकीय प्रणाली वापरण्यात येते. प्रत्येक सदस्याकडे लॉगिन आयडी व पासवर्ड असतो. सदस्यांकडून इतर सदस्यांना ‘रिक्वेस्ट’ पाठविण्यात येते. त्याला सहमती दिली तरच प्रश्नात नाव जोडले जाते. ही प्रणाली ‘ऑटोमेटेड’ आहे. त्यामुळे या तिन्ही सदस्यांची नावे सहमतीशिवाय प्रश्नात कशी आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: There are signs of controversy over a question in the Legislative Council's question-and-answer booklet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.