नागपुरात सध्या लॉकडाऊनचे नियोजन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:21+5:302021-09-08T04:12:21+5:30
नागपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले ...
नागपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसात वाढली असली तरी सध्याच लॉकडाऊन लावण्याचे नियोजन नाही. निर्बंध लावणे अथवा वाढविणे ही जबाबदारी कॅबिनेटची असते. अद्याप तशी भूमिका राज्यात कुठेही घेतलेली नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील दोन मंत्र्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे निर्बंधांबाबतचा संभ्रम आणखी वाढीस लागला आहे.
मंगळवारी नागपूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, हे खरे असले तरी रुग्णसंख्येवर पुढील निर्णयाची परिस्थिती अवलंबून असेल. नागपूर संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली अथवा नाही, हे आपणास माहीत नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली आहे. रुग्णालय आणि ऑक्सिजनचेही नियोजन केले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध करण्याचा विषय सध्या कॅबिनेट समोर नाही. मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत थोडी वाढ आहे, नागपुरात वाढीला सुरुवात झाली आहे. टास्क फोर्स आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. कधीही प्रवेश करू शकते, ती रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
महाज्योतीला बदनाम करू नका
महाज्योतीवरून होत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महाज्योतीला कुणीही बदनाम करू नये. महाज्योती स्थापन होऊन जेमतेम दोनच वर्षे झाली, वर्षभर कोरोनामुळे काम करता आले नाही. हे समजून घ्यावे. महाज्योतीसाठी मार्च-२०२१ पर्यंत ३५ कोटी आणि सप्टेबर-२०२१ पर्यंत ४.५० कोटी असा ४९.५० कोटी रुपयांचा निधी आला. असे असताना १२५ कोटी निधी परत कुठून जाणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.