मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:33+5:302021-09-02T04:15:33+5:30
नागपूर : आधी संजय राठोड गेले, मग अनिल देशमुख आणि आता अनिल परब आहे. रांगेत एक एक मंत्री आहे. ...
नागपूर : आधी संजय राठोड गेले, मग अनिल देशमुख आणि आता अनिल परब आहे. रांगेत एक एक मंत्री आहे. मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे. काही जण सुपात आहेत तर काही जात्यात आहेत. एजन्सीला काम आहे ते सर्व बाहेर काढतील, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना इशारा दिला.
चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मंत्री कोण आहेत? अनिल परब यांनी ईडीकडे चौकशीला जायला हवे होते. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, ती केस चालवायला हवी आणि संपवायला हवी. आता एक फेक केस तयार केली त्यात क्लीन चिट मिळाली. ती केस पूजा चव्हाणच्या केसशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनिल देशमुख यांच्या क्लीन चिटचा ढोल दिवसभर वाजवला व सीबीआयच्या खुलाशानंतर सर्व बिळात जाऊन बसले. महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना ईडीचा फायदा होणार असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल पेढे वाटावेत. सत्तेचा गैरवापर याआधी इतका कधीच झाला नाही, असे सुप्रिया सुळे यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
कोकणात जनआशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाला. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आता ढासळत चालला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. शिवसेना हिंदुत्ववादी असती तर त्यांनी टिपू सुलतान जयंती साजरी केली नसती, अशी टीकाही त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाशिवाय भाजप राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.