नागपुरात आयटीआयला विद्यार्थ्यांचा वाढतोय कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:11 AM2021-08-25T04:11:14+5:302021-08-25T04:11:14+5:30
नागपूर : केंद्र सरकारने कौशल्य विकास अभ्यासक्रमाला प्रोत्साहन दिल्याने गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात ...
नागपूर : केंद्र सरकारने कौशल्य विकास अभ्यासक्रमाला प्रोत्साहन दिल्याने गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात याची प्रचिती नक्कीच येते. जिल्ह्यात शासकीय व खाजगी आयटीआय मिळून १० हजारावर जागा आहेत. त्यासाठी गेल्या वर्षी १४ हजारावर अर्ज आले होते. यंदाही विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. १९ ऑगस्टपर्यंत संचालनालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यासाठी ७,५०० अर्ज दाखल झाले आहेत.
पूर्वी कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी आयटीआयकडे वळायचा. पण हे चित्र गेल्या काही वर्षांत बदलले आहे. आयटीआयच्या काही ट्रेडचा कटऑफ ९० टक्क्यापर्यंत पोहचला आहे. गेल्या सत्रात कोरोनामुळे आयटीआयचे प्रशिक्षण ऑफलाईन सुरू होते. परंतु २०२१-२२ या सत्रात कौशल्य व उद्योजकता विभागाने आयटीआय खुले करण्याची परवानगी दिली आहे. सध्या ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. दुसरीकडे आयटीआय, पॉलिटेक्निक याकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल लक्षात घेता, गेल्या सत्रात शहरातील अकरावीच्या ४२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
- दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात एकूण आयटीआयच्या जागा - १०,१८८
शासकीय आयटीआयमधील जागा - ३,६४०
खासगी आयटीआयमधील जागा - ६,५४८
१९ ऑगस्टपर्यंत आलेले अर्ज - ७,४६७
- आयटीआयचे वेळापत्रक
१५ ते ३१ जुलै - ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे
२ सप्टेंबर - प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
२ व ३ सप्टेंबर - हरकती नोंदविणे
४ सप्टेंबर - अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
६ सप्टेंबर - पहिली प्रवेश फेरी यादी प्रसिद्ध करणे
- शासकीय आयटीआय विद्यार्थ्यांचे आकर्षण
दीक्षाभूमीजवळील शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचा दरवर्षी आग्रह असतो. या आयटीआयमध्ये २८ ट्रेड असून, १०३६ जागा आहेत. यातील काही ट्रेडला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद असतो. शिवाय शासकीय आयटीआयचा कॅम्पस चांगला असल्याने विद्यार्थ्यांची प्रथम प्राथमिकता असते.
- १९ ऑगस्टच्या अर्जाची संख्या लक्षात घेता, संमिश्र प्रतिसाद दिसतो आहे. पण ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरायचे आहेत. शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने नोंदणी होते. गेल्या काही वर्षांतील आयटीआयकडे वाढता कल लक्षात घेता, गेल्या वर्षीएवढेच अर्ज येतील, अशी खात्री आहे.
हेमंत आवारे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर