उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:43 PM2019-04-11T23:43:27+5:302019-04-11T23:47:43+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.
पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी येथील पेन्शननगर प्राथमिक शाळेत मतदानाचे चार बूथ होते. या केंद्रावर दुपारी १२ च्या सुमारास मतदानासाठी लांब रांग लागली होती. दोन-अडीच तास नागरिक रांगेत उभे होते. उन्हामुळे पाण्यासाठी मतदार भटकत होते. येथे पिण्याच्या पाण्याची, शौचालय व पंखे यापैकी कोणतही सुविधा नव्हती. यामुळे रांगेत उभे असलेले नागरिक घामाघूम झाले होते.
झिंगाबाई टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मतदान केंद्र होते. जागा कमी असल्याने गर्दी झाल्याने मतदारांची रांग रस्त्यापर्यत आली होती. दुपारच्या उन्हात मतदार रांगेत होते. येथे सावलीची व्यवस्था केली नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. यामुळे नागरिक त्रासले होते.
सिव्हील लाईन्स भागातील बिजलीनगर येथील महापालिकेच्या कलादालनात मतदान केंद्र होते. येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. मतदान केंद्राबाहेर पोलीस कर्मचारी व बूथवरील कार्यकर्ते उन्हातच होते. सावलीची व्यवस्था केली नव्हती. सिव्हील लाईन्स भागातील युगांतर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मतदान केंद्र होते. या केंद्रावरही पिण्याचे पाणी व सावलीची व्यवस्था नव्हती. सुरेंद्रगड येथील महापालिका शाळेत मतदान केंद्र होते. या केंद्रावर पिण्यासाठी पाणी नव्हते.
मोमीनपुरा भागातील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत महिला मतदारांनी दुपारी मतदानासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत प्रकाश अंधुक होता. लाईटची व्यवस्था नव्हती. निमुळती जागा असल्याने हवा खेळती नव्हती. त्यातच पंखे नसल्याने मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिला घामाघूम झाल्या होत्या. विशेष म्हणजे या केंद्रावरही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. उकाड्यामुळे त्रस्त झाल्याने अनेक जण मतदान न करता परत जात होते. सुविधा नसल्याने नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.