नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

By योगेश पांडे | Updated: April 4, 2025 05:51 IST2025-04-04T05:50:46+5:302025-04-04T05:51:06+5:30

Nagpur crime News: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

There is a lot of excitement in the market in Nagpur, a young man was shot dead, two were injured, three accused were arrested | नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

 - योगेश पांडे 

नागपूर - मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता व पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

सोहेल असे मृताचे नाव आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ ही घटना घडली. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बाजारात चार आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली. तेथील तरुणांना शाहरूख कुठे आहे असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला. त्यातील एक गोळी लागून सोहेल खान (३५) नावाचा तरुण जखमी झाला. तर भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या मो.सुलतान उर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेली व तोदेखील जखमी झाला. घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली व पळापळ झाली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम व भूषण अशी आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपी चंदू डोंगरे हा फरार आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळावरील तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

परिसरात तणाव, पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मेयो इस्पितळासमोरदेखील लोक जमले होते व तेथेदेखील तणाव निर्माण झाला होता. तेथे तहसील पोलिस ठाण्यातील पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: There is a lot of excitement in the market in Nagpur, a young man was shot dead, two were injured, three accused were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.