एकत्र लढल्याशिवाय घरेलू कामगारांना न्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 10:02 PM2022-08-06T22:02:10+5:302022-08-06T22:03:05+5:30
Nagpur News एकत्र आल्याशिवाय घरेलू कामगारांना पर्याय नाही. एकत्र येऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, तरच न्याय मिळवून घेता येईल, असे प्रतिपादन औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांनी केले.
नागपूर : घरेलू कामगारांना योग्य वेतन, आरोग्य सुविधा, म्हातारपणाची पेन्शन, आठवड्याची सुटी, दिवाळी बोनस मिळाले पाहिजे. हे मिळविण्यासाठी एकत्र आल्याशिवाय घरेलू कामगारांना पर्याय नाही. एकत्र येऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, तरच न्याय मिळवून घेता येईल, असे प्रतिपादन औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांनी केले.
विदर्भ मोलकरीण संघटनेच्या वतीने शनिवारी सर्वोदय आश्रम येथे डॉ. रूपा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत घरेलू कामगारांचा मेळावा आयाेजित करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव विलास भोंगाडे, घरेलू कामगार प्रतिनिधी कांता मडामे, फरझना, मंजुळा मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. लाेमटे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात घरेलू कामगारांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. शासनाने घरेलू कामगारांसाठी फारशी मदत केली नाही. कोरोना काळात औषधव्यवस्था, अन्नधान्य सोयीसुविधा, भाजीपाला, जाण्यायेण्यासाठी वाहनव्यवस्था केली नाही. संघटनांना आंदोलने, निवेदने द्यावी लागली, तेव्हा रेशनव्यवस्था सुरू झाली. मागच्या सरकारने संत जनाबाई घरेलू कामगार योजना सुरू करून कोरोना भत्ता दिला; परंतु तेवढ्याने प्रश्न सुटू शकत नाही. या गरीब महिलांना भरीव मदतीची गरज आहे, असे ते म्हणाले.
येत्या २२ ऑगस्टला विविध मागण्यांसाठी संविधान चाैक येथे आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती सुजाता भाेंगाडे यांनी प्रास्ताविकातून दिली. संचालन राेशनी गंभीर यांनी केले, तर राेशनी कुरील यांनी आभार मानले. आयाेजनात सरिता जुनघरे, सोनाली जिनदे, सुनील कुरील, सुरेख डोंगरे, मंगला देठे यांचा समावेश हाेता.