नागपुरात पावसाच्या नाही, घामाच्या धारा; सकाळी कुठे पडल्या सरी, कुठे काेरड : पारा चढला, उकाडा वाढला
By निशांत वानखेडे | Published: July 11, 2024 07:23 PM2024-07-11T19:23:45+5:302024-07-11T19:24:07+5:30
महाराष्ट्रात पावसाची अनुकूल स्थिती निर्माण झाली असून ९ जुलैपासून राज्यात सर्वदूर जाेरदार पाऊस हाेईल, असा अंदाज वेधशाळेने दिला हाेता. यात विदर्भाचाही समावेश हाेता.
नागपूर : वेधशाळेने केलेल्या जाेरदार पावसाच्या अंदाजाचा दुसरा दिवसही नागपूरकरांसाठी निराश करणारा ठरला. पावसाची प्रतीक्षा हाेत असताना पावसाच्या नाही तर नागरिकांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत हाेत्या. गुरुवारी तापमानही पुन्हा सरासरीच्या वर गेले.
महाराष्ट्रात पावसाची अनुकूल स्थिती निर्माण झाली असून ९ जुलैपासून राज्यात सर्वदूर जाेरदार पाऊस हाेईल, असा अंदाज वेधशाळेने दिला हाेता. यात विदर्भाचाही समावेश हाेता. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जाेरदार तर कुठे मध्यम पाऊस पडतही आहे. मंगळवारच्या रात्री नागपुरातही हलक्या सरी बरसल्या हाेत्या. त्यानंतर मात्र सातत्याने भ्रमनिराश हाेत आहे.
गुरुवारीही पावसाने वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी दिली. उलट उन पडल्याने कमाल तापमानात सरासरीपेक्षा एका अंशाने अधिक वाढ झाली असून ३३.४ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. सकाळी वातावरणातील आर्द्रता ९० टक्क्यांवर हाेती. यामुळे सकाळी पारा २८ अंशांवर असताना उकाडा ३४ अंशांचा असल्यासारखे जाणवत हाेते. आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव तीव्र हाेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पावसाळा असूनही नागपूरकरांच्या शरीरातून घाम निघत आहे.