येथेही होऊ शकते भंडाऱ्याच्या घटनेची पुनरावृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:07+5:302021-01-10T04:07:07+5:30
नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. ही घटना ...
नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. ही घटना राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेची पोलखोल करणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने शहरातील प्रसुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या डागा स्मृती रुग्णालयाचा आढावा घेतला असता येथील अग्निशमन व्यवस्था वाऱ्यावर दिसून आली.
गांधीबागेतील डागा स्मृती रुग्णालय प्रसुतीसाठी प्रसिद्ध आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला विशेष काळजीची गरज असल्यास नवजात शिशु विषेश दक्षता कक्ष सुद्धा येथे आहे. प्रसुती झाल्यानंतर महिलांची काळजी घेण्यासाठी वाॅर्डाची सोय आहे. या रुग्णालयातील अग्निशमन व्यवस्थेचा आढावा लोकमतने घेतला. डागा रुग्णालयाच्या इमारतीत प्रवेश करतानाच तीन फायर एस्टींग्युशर लावलेले आहेत. येथे ब्लड बँक व तपासणी कक्ष आहे. रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर विशेष दक्षता कक्ष व डिलेव्हरी वाॅर्ड आहे. पण या माळ्यावर कुठलेही फायर एस्टींग्युशर नाही. याच माळ्यावर हात पुरेल एवढ्या अंतरावर विद्युत उपकरणे लावलेली आहे. त्यातील विद्युत तारा उघड्यावर आहे. विशेष दक्षता कक्षात फायर एस्टींग्युशर दिसून आले नाही. पहिल्या माळ्यावर फायर एक्झिटचे बोर्ड लावलेले आहे. पण आग लागल्यास विझविण्यासाठी उपाययोजना नाही. एका वाॅर्डापुढे फायर एस्टींग्युशर लटकविण्यासाठी हुक लावल्या होत्या. ते कसे हाताळायचे याचे माहितीपत्रकही लावले होते. पण उपकरण काढून टाकले होते. महिला भरती असलेल्या वाॅर्डात किंवा विशेष काळजीची गरज असलेल्या दक्षता विभागात अग्निशमन यंत्रणा दिसून आली नाही. विशेष म्हणजे भंडाऱ्याची घटना घडल्यामुळे डागा रुग्णालयाचे प्रशासन कदाचित सतर्क झाल्याचे दिसले. ‘अपात्कालीन मार्ग’ असे लिहून स्टीकर्स पायऱ्यावर लावलेले होते. पण अपात्कालीन मार्गाच्या गेटला कुलूप लावलेले होते. दुसऱ्या माळ्यावर सुद्धा अग्निशमन यंत्रणा दिसून आली नाही.
विशेष म्हणजे डागा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात प्रसुती होतात. पण अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना वाऱ्यावर होत्या.
- मेडिकलमध्येही विशेष सुविधा नाही
मेडिकलच्या नवजात शिशु दक्षता केंद्रात प्रवेश करताच फायर एस्टींग्युशर लावलेले होते. पण आतमध्ये अग्निशमनच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना दिसून आल्या नाही.