नागपूर मनपा परिवहन विभागात २३० भंगार बसचा डाटा उपलब्ध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:50 PM2018-07-26T21:50:32+5:302018-07-26T21:52:57+5:30
महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बस जयताळा व टेका नाका येथील डेपोत मागील काही वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहेत. परंतु बस क्रमांक, चेसीज क्रमांक, कशा अवस्थेत आहे. कुठल्या क्रमांकाची बस कोणत्या डेपोत आहे. याचा डाटा परिवहन विभागाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती भंगार बसच्या विल्हेवाटीसाठी गठित करण्यात आलेल्या भंगार समितीच्या निदर्शनास आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बस जयताळा व टेका नाका येथील डेपोत मागील काही वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहेत. परंतु बस क्रमांक, चेसीज क्रमांक, कशा अवस्थेत आहे. कुठल्या क्रमांकाची बस कोणत्या डेपोत आहे. याचा डाटा परिवहन विभागाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती भंगार बसच्या विल्हेवाटीसाठी गठित करण्यात आलेल्या भंगार समितीच्या निदर्शनास आली आहे.
समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली. यात भंगार बसचा आढावा घेण्यात आला. टेकानाका येथील डेपोत १२३ बस तर जयताळा येथील डेपोत १०६ बस ठेवण्यात आलेल्या आहेत. यातील अनेक बसचे टायर, इंजिन, काचा व अन्य किमती स्पेअर पार्ट बेपत्ता आहेत. परंतु नेमके कोणत्या क्रमांकाच्या बसचे स्पेअर पार्ट बेपत्ता आहेत याची माहिती परिवहन विभागाकडे उपलब्ध नसल्याने भंगाराचा लिलाव करताना अडचणी येणार आहेत. याचा विचार करता सर्व २३० भंगार बसचा डाटा पाच दिवसात समितीला सादर करण्याचे निर्देश प्रवीण भिसीकर यांनी दिले.
बैठकीला समिती सदस्य अर्चना पाठक, नितीन साठवणे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, तांत्रिक सहायक योगेश लुंगे, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, परिवहन श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.
डेपोत ठेवण्यात आलेल्या २३० बसचे बाजारमूल्य निश्चित करण्याची मागणी समितीने राज्य परिवहन महामंडळाला केली होती. मात्र महामंडळाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासकीय विमा कंपनीकडून सर्व भंगार बसचे बाजारमूल्य काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तसेच ई-निविदा प्रक्रियेचा मसुदा १५ दिवसात तयार करून पुढील सभेत याची माहिती सादर करण्यात यावी. संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश भिसीकर यांनी दिले.
भगार बस विक्री प्रक्रिया तातडीने करता यावी. यासाठी भंगारातील प्रत्येक बसेसची विस्तृत माहिती संकलित करावी. निरुपयोगी ठरलेल्या बसच्या विक्रीसंबंधीच्या प्रक्रियेमध्ये गोपनीयता कायम राहील याकडे लक्ष देण्यात द्यावे, अशी सूचना नितीन साठवणे यांनी केली.
बस गेल्या कुठे?
डेपोत २३० बस ठेवण्यात आल्या होत्या. यातील ३ बस जळाल्या होत्या. एक बस सुनील हायटेक इलेक्ट्रीकल कंपनीला देण्यात आली होती. ती अद्याप परत मिळालेली नाही. तसेच काही बसची माहिती नसल्याने या बस गेल्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून लिलाव
भंगारात ठेवण्यात आलेल्या बस संदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. या बसची मालकी महापालिकेकडे की व्हीएनआयएल कंपनीकडे राहणार हे न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भंगार बसच्या लिलावातून प्राप्त होणारा पैसा न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून महापालिकेकडे ठेवला जाणार आहे.
बस डेपोचे भाडे ५.५० लाख
टेका नाका येथील बस डेपोची जागा खासगी असून येथे बस ठेवण्यासाठी व्हीएनआयएल वर्षाला साडेपाच लाख रुपये भाडे देते याचा विचार करता २०१२ सालापासूनची भाड्याची रक्कम गृहीत धरल्यास हा आकडा ३० लाखांच्या पुढे जातो. भंगार विक्रीचा निर्णय न घेतल्यास पुढील काही वर्षात भंगाराच्या किमतीपेक्षा भाड्याची रक्कम अधिक होणार आहे.