नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी मंदिरात यापुढे पशूबळी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:09 PM2018-10-09T12:09:08+5:302018-10-09T12:11:20+5:30
कोराडी येथील श्री.महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिरात २५० वर्षांपासून सुरु असलेली पशुबळीची परंपरा बंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : कोराडी येथील श्री.महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिरात २५० वर्षांपासून सुरु असलेली पशुबळीची परंपरा बंद करण्यात आली आहे. शनिवारी कोराडी येथे श्री.महालक्ष्मी संस्थांनचे मुख्य मार्गदर्शक, विश्वस्त व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संस्थानचे अध्यक्ष अॅड. मुकेश शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या या सुधारणावादी निर्णयाचे भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी या विषयावर संस्थान आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
कोराडी मंदिरात २५० वर्षांपासून पशुबळीची प्रथा सुरु होती. कोंबडे-बकरे वाजतगाजत मातेच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणायचे व ‘झडती’ दिल्यावर त्यांचा बळी द्यायचा अशी ही परंपरा सतत सुरू होती. फार पूर्वीपासून येथे मरी माता मंदिर होते. त्या ठिकाणी पशुबळी दिले जायचे. कालांतराने काही भाविकांचा विरोध झाल्यावर ही जागा बदलविण्यात आली. यानंतर खापरखेडा मार्गाला लागून एक मंदिर बांधण्यात आले. या ठिकाणी पशुबळी देण्यास सुरुवात झाली. रविवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवारला या ठिकाणी ‘ओल्या’ खानावळी चालायच्या. वैज्ञानिक प्रगतीत या प्रथा बंद व्हाव्यात, अशी मागणी होत असताना याचे प्रमाण मात्र वाढत चालले होते. मंदिरासमोरच हे किळसवाणे कृत्य पाहून अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या जात होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडल्यावर पिपळा डाकबंगला येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक वाठ यांनी पशुबळीच्या विरोधात कोराडी मंदिरात आंदोलनही केले होते.
सकारात्मक मार्गाने पशुबळीला विरोध दर्शवित भाविकांना पशुबळी देण्यापासून थांबविण्यासाठी वाठ यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक भाविकांचे मन वळवून त्यांनी आणलेला बकरा मुक्त करून त्यांना बांगी (भाजी) मोफत देऊन पशुबळीला रोख लावण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात संस्थांचे सचिव केशवराव फुलझेले (महाराज) व विश्वस्त बाबुराव भोयर यांनाही तेंव्हा मदत केली होती. असे असली तरी पशुबळी देण्याच्या रुढीवादी परंपेरवर फारसा प्रभाव झाला नाही.
कोट्यवधी रुपये खर्च करून कोराडी येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे. हे स्थळ धार्मिक स्थळ म्हणून देशपातळीवर विकसित होत आहे. त्यामुळे कोराडी शक्तिपीठाला ‘ओल्या पार्ट्यामुळे’ बदनामीचा सामना करण्याची गरज पडू नये या दृष्टीने संस्थानचा निर्णय ऐतिहासिक व भाविकांच्या भावनेचा आदर करणारा ठरणार आहे.
दोन अखंड ज्योती, हजारो लिटर तेलाची बचत
संस्थानद्वारे नवरात्र काळात हजारो सामूहिक अखंड मनोकामना ज्योतीचे प्रज्वलन केले जात होते. या माध्यमातून नऊ दिवसाच्या कालावधीत या ज्योतीसाठी हजारो लिटर तेल जाळल्या जात होते. संस्थानने भाविकांच्या अखंड ज्योतीसंदर्भात असलेल्या धार्मिक भावना व तेलाचा अपव्यय (पर्यावरणपूरकता) या दोन्ही बाबींचा मध्यांक शोधून यावर उपाय म्हणून केवळ दोन मुख्य अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात योगदान म्हणून भाविक संकल्प राशी देऊ शकतील. यामुळे हजारो लिटर तेलाचा अपव्यय टाळून पर्यावरणाला मदत होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
मंदिर परिसरात मद्यपानावर बंदी
पशुबळीसोबतच मंदिर परिसरात मद्यपान, तंबाखू, धूम्रपानावरही बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधी उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाहीसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनला कळविण्यात आले आहे. कोराडी ग्रा.पं.सुद्धा या निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी मदत करणार आहे.