आधीच बेड नाही, त्यात औषधांचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:25+5:302021-04-24T04:07:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरची स्थिती अतिशय भयावह झाली आहे. संक्रमितांचा आकडा दररोज पहिल्या ...

There is no bed already, there is also a shortage of medicines | आधीच बेड नाही, त्यात औषधांचाही तुटवडा

आधीच बेड नाही, त्यात औषधांचाही तुटवडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरची स्थिती अतिशय भयावह झाली आहे. संक्रमितांचा आकडा दररोज पहिल्या लाटेच्या तुलनेत चारपटीने वाढतो आहे. संक्रमितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने कोरोना मुक्तीचा आकडा उत्तम असला तरी ठेंगणा वाटत आहे. याच्या परिणामी नव्या संक्रमितांची व अत्यवस्थ रुग्णांची स्थिती आणखी बिकट बनली आहे. त्यातच औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याने जो रुग्ण सात दिवसात बरा व्हायला हवा, त्याचा मुक्काम दहा ते बारा, तर कधी १५ दिवसांपर्यंत वाढत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना उपचारात संजीवनी म्हणून बाऊ करण्यात आलेल्या रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर या इंजेक्शनचा काळाबाजार फोफावल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात दररोज कारवाई सुरू असून, अनेक जण अटकेत आहेत. मात्र, काळाबाजार आणि रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट थांबलेली नाही. हजार-दोन हजाराचे हे इंजेक्शन २५ ते ३० हजार रुपयांना ब्लॅकमध्ये विकले जात आहे. त्यातच फेव्हिपिरॅव्हीर, टॉसिलीझूमॅप व्हायल ही कोरोना उपचारातील आवश्यक औषधेही औषधालयांमध्ये संपलेली आहेत. याबाबत शासकीय व प्रशासकीय यंत्रणा स्पष्टीकरण देण्यास प्रतिकूल ठरत आहेत. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने बेड्स मिळाल्यावरही उपचार करायचे कसे, हा प्रश्न खासगी कोविड केंद्रांना पडला आहे. मात्र, यावर बोलण्यास तेही नकार देत आहेत. या स्थितीमुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. ज्यांना हॉस्पिटल किंवा बेड मिळाले ते क्षणिक खूश आहेत. मात्र, जेव्हा त्यांना उपचारासाठीची औषधे मिळत नाहीत, तेव्हा त्यांचा जीव टांगणीला लागतो आहे आणि हॉस्पिटलमधील मुक्कामही वाढतो आहे. याचा फटका ज्या अत्यवस्थ रुग्णांना तात्काळ हॉस्पिटल किंवा बेडची गरज आहे, त्यांना बसतो आहे.

------------------

पॉईंटर्स

एकूण रुग्ण - २,६६,१५१

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ४३,८४२

------------------

जिल्हाधिकारी व इतर यंत्रणा संपर्काच्या बाहेर

सध्या जिल्ह्यातील संक्रमित रुग्णांची स्थिती, उपचाराची व्यवस्था आणि औषधांचा काळाबाजार हे मोठे निर्माण झालेले प्रश्न आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता, ते संपर्काच्या बाहेर होते. ज्यांच्याशी संपर्क झाला, त्यांनी कॉल ड्राॅप केल्याची स्थिती होती. यावरून स्थितीची जाणीव स्पष्ट होते.

--------------

घरात सातजण कोविड संक्रमित होते. माझा भाऊ अत्यवस्थ होता. मात्र, त्याला कुठेच बेड उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर ओळखीच्या डॉक्टरांनी घरीच उपचार करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला. आम्ही सगळेच बरे आहोत. मात्र, औषधांअभावी कोरोना उपचाराचा प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर हॉस्पिटल्स काय कामाची, असा प्रश्न निर्माण होत आहे.

- अमित शेंडे

--------------

मी आणि आई वगळता घरातील पाच सदस्य संक्रमित झाले आहेत. हॉस्पिटल उपलब्ध होत नाही. औषधे मिळत नाहीत. अशा स्थितीत काय करावे, हा प्रश्न आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार सुरू केले. आता सगळे व्यवस्थित आहेत. मात्र, या काळात जी भयावहता अनुभवली, ती अतिशय धोकादायक होती.

- जितेंद्रगिरी स्वामी

------------

माझी आई गेल्या १२ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. वडिलांनाही उशिरा हॉस्पिटल मिळाले. मात्र, वेळेवर औषधे प्राप्त झाली नाहीत. अशा स्थितीत एकमेकांना धीर देत आहोत. डॉक्टरही औषधे नसल्याने हवालदिल असल्याचे दिसून येत आहे.

- स्वाती कुळकर्णी

..................

Web Title: There is no bed already, there is also a shortage of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.