लाखोंची उधळपट्टी, जिवंत झाडांचा पत्ता नाही
By admin | Published: August 15, 2015 03:04 AM2015-08-15T03:04:44+5:302015-08-15T03:04:44+5:30
नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.
मनपाच्या वृक्षलागवडीची चौकशी करा : जनमंचची मागणी
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याबाबतचा पुरेसा अहवालच मनपाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे मनपाच्या वृक्षारोपण कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या वृक्षारोपनाच्या चौकशीची मागणी जनमंचने केली आहे.
सामाजिक संघटना जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांच्यातर्फे माहितीच्या अधिकारात मनपाच्या उद्यान विभागाकडे जून २०१२ ते जून २०१५ या कालावधीत वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात आलेली झाडे, यापैकी जिवंत असलेली झाडे आणि या उपक्रमावर झालेला खर्च याबाबत माहिती मागविण्यात आली. याअंतर्गत मनपाकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्यान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे २०१२ ते २०१३ या कालावधीत विभागाद्वारे १ लाख २७ हजार रोपटे लावण्यात आली. २०१३-२०१४ या काळात २३ हजार ५२७ वृक्ष लावण्यात आली, तर २०१४ ते २०१५ या कालावधीत केवळ १८ हजार २२१ झाडे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापैकी जिवंत उरलेल्या झाडांबाबत प्राप्त माहितीनुसार २०१२-२०१३ या काळातील केवळ ४८ हजार ७११ झाडे जगू शकल्याचे समजते. २०१३-२०१४ या कालावधीतील केवळ १६०० झाडे जिवंत आहेत, तर २०१४-२०१५ या काळातील केवळ ७८८२ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्षारोपण हे लोकसहभागातून झाल्यामुळे उर्वरित झाडांची माहिती मिळणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लागलेल्या खर्चाबाबत मनपाने संभ्रम निर्माण करणारे उत्तर दिले आहे. उद्यान विभागतर्फे २०१४ ते २०१५ या कालावधीत वृक्षारोपणावर २६ लाख ३६ हजार ९२२ खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आल्याचे कारण देत २०१२-२०१३ आणि २०१३-३०१४ चा खर्च सादरच करण्यात आला नाही.
वृक्षलागवडीनंतर झाडे जगविणे शक्य नसल्यास लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. हिरवळीच्या नावाखाली हिरव्या व लाल नोटा खिशात भरण्यासाठीच हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिकेने तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी प्रमोद पांडे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)