मनपा मुख्यालयातच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:33+5:302021-03-31T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात दररोज १६ ते १७ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. यात ३५०० ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात दररोज १६ ते १७ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. यात ३५०० ते चार हजारांच्या आसपास पॉजिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.
म्हणजे तपासणी केलेल्यांपैकी २० ते २५ टक्के बाधित निघत आहेत. महापालिका मुख्यालय व झोन कार्यालयातील बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी असलेल्या महापालिका मुख्यालयातच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
मनपाच्या आरोग्य विभागामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे. दररोज २५ हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. तसेच नागरिकांशी सर्वाधिक संपर्कात येणारे किराणा दुकानदार, फळ, भाजीविक्रेते, सलून चालक तसेच औषधविक्रेते कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स ठरण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे या व्यावसायिक, विक्रेत्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरू असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहेत. मात्र मनपा कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असतानाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष दिसत आहे.
...
पथक पोहोचत नाही
नागपूर शहारात ३० हजारांहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी असलेल्या मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक पोहोचत नसल्याचे चित्र आहे. मनपाने १५१ पथक गठित केले आहे. प्रत्येक पथकात दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या घरोघरी जाऊन पथकामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे या पथकांना शक्य नाही. पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
......
रिक्त बेडची माहिती मिळत नाही
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. रुग्णांची बेडसाठी भटकंती सुरू आहे. दुसरीकडे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात खाली असलेल्या ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची माहिती मनपाच्या कंट्रोल रूममधून मिळत नाही. कंट्रोल रूमकडे सकाळ, संध्याकाळ रिक्त बेडची माहिती उपलब्ध होते. त्यानुसार यादी दुसऱ्या दिवशी प्रकाशित केली जाते. यादी बघून गरजू बेडसाठी रुग्णालयात फोन करतात. मात्र बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. कंट्रोल रूमला फोन केला तर त्यांच्याकडेही त्यावेळची परिस्थिती उपलब्ध नसते.