उपराजधानीत रविवारी एकही कोरोनाग्रस्त नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:39 AM2020-03-16T10:39:13+5:302020-03-16T10:42:12+5:30
उपराजधानीत रविवारी एकही कोरोनाग्रस्ताची नोंद झाली नाही, शिवाय आठ नमुने निगेटिव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण वाढत असताना त्यातुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे. रविवारी एकही कोरोनाग्रस्ताची नोंद झाली नाही, शिवाय आठ नमुने निगेटिव्ह आले. यामुळे आरोग्य विभागावरील ताण काहीसा कमी झाला. सध्या शहरात या आजाराचे चारच रुग्ण आहेत. यातील तिघांवर मेडिकलमध्ये तर एकावर मेयोमध्ये उपचार सुरू आहेत. आज मेयो, मेडिकलमध्ये २० संशयितांना दाखल करण्यात आले. यात एका मेडिकलच्या निवासी डॉक्टरचा समोवश आहे. रविवारी मेडिकल, मेयोतील ४१ नमुन्यांपैकी ४० नमुने निगेटिव्ह आले.
कोरोना विषाणूविषयी नागरिकांमध्ये भीती असली तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नही केले जात आहे.
प्रतिबंधक उपाययोजनेला प्राधान्य दिले जात आहे. रविवारी सुटीचा दिवस असतानाही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मेयो, मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डाची पाहणी केली. त्यांनी दोन्ही रुग्णालयातील व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. संशयित म्हणून भरती असलेल्या निवासी डॉक्टरच्या प्रकृतीचीही त्यांनी माहिती घेतली.
प्राप्त माहितीनुसार, या डॉक्टरची ड्युटी २ मार्चपासून आयसोलेशन वॉर्डात लावण्यात आली होती. ‘पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ (पीपीई) नावाच्या किटचा वापरही करीत होता.
शनिवारी अचानक ताप, सर्दी व खोकल्याची लक्षणे आढळून आली. यामुळे रविवारी भरती करून घेऊन नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
दिवसभरात मेडिकलमध्ये २९ नमुने
मेडिकलमध्ये रविवारी संशयित रुग्णांची संख्या वाढली. तब्बल २९ नमुने गोळा करण्यात आले. यात अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया व इतर देशातून प्रवास करून आलेल्यांना व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा १९ संशयितांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
निगेटिव्हमध्ये चारवर्षीय मुलगी
मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात रविवारी आठ नमुने निगेटिव्ह आले. यात मेडिकलमधील पाच, बुलडाणा, अमरावती व अकोला येथील एक-एक नमुन्याचा समावेश आहे. मेडिकलमधील निगेटिव्ह आलेल्यामध्ये चारवर्षीय मुलीचा समावेश होता. या सर्वांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
३३ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
रविवारी मेडिकलने २९, यवतामळ व चंद्रपूर जिल्ह्यामधून प्रत्येकी दोन-दोन असे एकूण ३३ नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे.