येचुरींच्या प्रवास खर्चावर एकही पैसा खर्च नाही

By Admin | Published: March 23, 2017 02:21 AM2017-03-23T02:21:56+5:302017-03-23T02:21:56+5:30

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द होऊन

There is no cost to spend on Yachuri's travel expenses | येचुरींच्या प्रवास खर्चावर एकही पैसा खर्च नाही

येचुरींच्या प्रवास खर्चावर एकही पैसा खर्च नाही

googlenewsNext

आगलावेंचा दावा : पाहुण्यांच्या विमान तिकिटासाठी लेखी परवानगीची गरज नाही
नागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द होऊन आठवडा लोटला असला तरी अद्यापही वातावरण तापलेलेच आहे. कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता नसल्याने येचुरींचे विमान तिकीट कुणी काढले, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला होता. मात्र येचुरी यांच्या प्रवासखर्चावर विद्यापीठाचा एकही रुपया खर्च झालेला नाही. शिवाय अध्यासनाच्या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांच्या विमान तिकिटासाठी लेखी परवानगीची आवश्यकता नाही, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.
विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र प्रशासकीय परवानगीच घेतली नसल्याच्या कारणावरुन संबंधित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. सीताराम येचुरी यांनी नागपुरात आल्यानंतर यासंदर्भात टीका केली व विद्यापीठाने मला एक महिना अगोदर तिकीट का पाठविले असा प्रश्न उपस्थित केला.
संबंधित कार्यक्रमाचे आयोजन व पाहुण्यांना विमानाची तिकिटे पाठविणे यासाठी माझी लेखी परवानगी घेण्यात आली नव्हती. मग येचुरी यांना तिकीट कुणी पाठविले, असा प्रतिप्रश्न कुलगुरूंनी केला होता.
याबाबत डॉ.आगलावे यांना विचारणा केली असता संबंधित कार्यक्रम हा अध्यासनांतर्गत येत होता व सामाजिक न्याय विभागातर्फे त्यासाठी निधी देण्यात आला होता. यात पाहुण्यांच्या प्रवासखर्चाचादेखील समावेश असतो. म्हणून पाहुण्यांच्या विमानतिकिटासाठी लेखी परवानगी घेण्याची आवश्यकताच नव्हती, असा दावा डॉ.आगलावे यांनी केला.(प्रतिनिधी)

येचुरी यांनी दिले तिकिटाचे पैसे
सीताराम येचुरी यांचे दिल्ली ते नागपूर असे विमानाचे तिकीट काढण्यात आले होते. तसेच त्यांचे परतीचेदेखील तिकीट होते. मात्र कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे परतीचे तिकीट रद्द करण्यात आले. येचुरी यांना नागपुरातून हैदराबादला जायचे होते. त्यामुळे ऐनवेळी तिकीट रद्द करू नका. दिल्लीहून मी त्याच तिकीटावर नागपूरला येतो व त्याचे पैसे देतो, अशी विनंती येचुरी यांनी केली होती.नागपुरात आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली-नागपूर विमानतिकीटाचे पैसे दिले. त्यामुळे विद्यापीठाचा एकही रुपया खर्च झाला नाही, असे डॉ.आगलावे यांनी सांगितले. याबाबतचे सर्व लेखी पुरावे उपलब्ध असून ते कुणालाही दाखवायला तयार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम दीक्षांत सभागृहात कसा ?
डॉ.आगलावे यांनी कुलगुरूंची लेखी परवानगी घेतल्याचा दावा केला, तर कुलगुरुंनी याचा इन्कार केला आहे. दीक्षांत सभागृहात विविध व्याख्यानमालांचे आयोजन व्हायचे. काही मोजक्या वगळल्या तर सर्व व्याख्यानमाला शैक्षणिक विभागातच घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. कुठल्या विभागाच्या सेमिनार किंवा परिषदेसाठी दीक्षांत सभागृह दिले जात नाही. मग अशा स्थितीत जर कुलगुरूंची परवानगीच नव्हती तर दीक्षांत सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या पत्रिका कशा काय छापण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Web Title: There is no cost to spend on Yachuri's travel expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.