आता भूल देण्याचा धोका नाही : शस्त्रक्रिया झाल्या सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:38 PM2018-07-21T22:38:57+5:302018-07-21T22:45:52+5:30
शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भुलीविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. यामुळे शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाल्या आहेत, अशी ग्वाही ‘इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियालॉजिस्ट, नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भुलीविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. यामुळे शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाल्या आहेत, अशी ग्वाही ‘इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियालॉजिस्ट, नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
‘इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियालॉजिस्ट, नागपूर शाखेची नवी कार्यकारिणी नुकतीच स्थापन झाली. या शाखेच्या अध्यक्ष डॉ. सुनिता लवंगे, माजी अध्यक्ष डॉ. शीतल दलाल, सचिव डॉ. उमेश रामतानी, व सहसचिव डॉ. दीपक मदनकर यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत ‘लोकमत’शी संवाद साधला.
बधिरीकरण तज्ज्ञ पडद्यामागचा कलाकार नाही
डॉ. सुनिता लवंगे म्हणाल्या, बधिरीकरणतज्ज्ञ हा केवळ पडद्यामागचा कलाकार नाही. शस्त्रक्रिया गृहाचा खरा ‘सारथी’ आहे. तो शस्त्रक्रियेच्या आत आणि बाहेरही आपल्या विविध भूमिका वठवित असतो. यात आकस्मिक विभाग, अतिदक्षता विभाग, दीर्घकालीन वेदना चिकित्सा विभाग आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा कवचामध्ये असलेल्या वैद्यकीय पथकामध्येसुद्धा बधिरीकरणतज्ज्ञाचा समावेश होऊ लागला आहे. या पथकात त्यांची ‘चमू प्रमूख’ म्हणून नेमणूक केली जाते.
कर्करोगाच्या वेदना झाल्या सुसह्य
कर्करोगाच्या रुग्णाला असह्य वेदना सोसाव्या लागतात. अशा रु ग्णाचा मृत्यू टाळता येण्याजोगा नसला तरी विकसित बधिरीकरण तंत्रामुळे त्याच्या वेदना सुसह्य करता येणे शक्य झाले आहे. बायपास सर्जरी, अवयवप्रत्यारोपण यासारख्या अत्यंत अवघड शस्त्रक्रिया केवळ बधिरीकरण तंत्रातील आश्चर्यकारक प्रगतीमुळेच शक्य झाल्याचे डॉ. लवंगे म्हणाल्या.
ज्येष्ठांना वेदनाशामक औषधांपेक्षा प्रेमाची गरज
वृद्धापकाळाच्या साथीला अनेक आजार असतात. या आजाराची दुखणे घेऊन जगताना त्यांच्यावर एकत्रितपणे उपचार करावे लागतात. हे खरे असले तरी ज्येष्ठांना घरात मिळणाºया वागणुकीमुळेही त्यांच्या दुखण्यात मोठी भर पडते. त्यामुळे वृद्धांना प्रेम, दिलासा देत त्यांचे मनोधर्य वाढविल्यास त्यांचे अर्धे दुखणे कमी होते. त्यांना आनंदी ठेवण्यासह त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिल्यास दुखण्यांना निश्चितच आळा घालता येऊ शकतो, असेही डॉ. लवंगे म्हणाल्या.
प्रसूतीवेदना न जाणवता सुलभ प्रसूती शक्य
डॉ. शीतल दलाल म्हणाल्या, प्रगत बधिरीकरणशास्त्रामध्ये जुन्या औषधी मागे पडल्या आहेत. आता अद्यावत मशीन आणि नव्या औषधांमुळे भूल देण्याचा धोका राहिलेला नाही. बधिरीकरणशास्त्राने केलेली ही प्रगती अचंबित करणारी आहे . विशेषत: वेदनारहित शस्त्रक्रिया करण्यापुरते आता बधिरीकरणशास्त्र मर्यादित राहिलेले नाही तर या शास्त्राचा सर्वत्र संचार सुरू आहे. अनेक ठिकाणी बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपयोगी पडत आहे. याचा सर्वात जास्त फायदा प्रसूतीवेदना सहन न होणाऱ्या स्त्रियांना होत आहे. प्रसूतीवेदना न जाणवता सुलभ प्रसूती शक्य झाली आहे.
आता ‘पेन क्लिनिक’
डॉ. उमेश रामतानी म्हणाले, बधिरीकरण तज्ज्ञ हा आता पडद्यामागचा कलाकार राहिलेला नाही. विशेष म्हणजे, आता शहरामंध्ये ‘पेन क्लिनिक’ उघडले जात आहे. ज्यांना दुखण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे क्लिनिक उपयुक्त ठरत आहे. शासकीय रुग्णालयांमध्येही हे क्लिनिक असल्याने मोठ्या संख्येत रुग्णांना याचा फायदा पोहचत आहे. बधिरीकरण तज्ज्ञाचे कार्य ढोबळमानाने केवळ रुग्णाला बेशुद्ध करणे एवढेच नसते तर त्याला भूल देण्यासोबतच त्याला त्यातून सहीसलामत बाहेर काढणे, शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाचा रक्तदाब, नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्याचे कार्यही त्यालाच करावे लागते. बधिरीकरण तज्ज्ञामुळेच रुग्ण ‘पेन फ्री’ होऊ शकतो. शल्यक्रिया हे एक ‘टीम वर्क’ आहे. यात शल्यचिकित्सकाएवढीच महत्त्वाची भूमिका व जबाबदारी बधिरीकरण तज्ज्ञाची असते.
१० हजारांवर लोकांना ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ प्रशिक्षण
डॉ. उमेश रामतानी म्हणाले, अचानक हृदय शस्त्रक्रिया बंद पडली की मेंदूला प्राणवायूचा पुरवठा बंद होतो. पुढील ४-५ पाच मिनिटांत मेेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत झाला नाही तर मेंदूचे कार्य पूर्ण बंद होते आणि मेंदू मृत अवस्थेत जातो. म्हणूनच मेंदूचा मृत्यू होऊ नये व जीव वाचावा यासाठी कोणतीही उपकरणे किंवा साधने हाती नसताना सर्वसामान्य नागरिकांनी काय काय करावे, याची माहिती ‘बेसिक लाईफ सपोर्ट’च्या कार्यक्रमातून देण्याचा उपक्रम इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियालॉजिस्ट, नागपूर शाखेने हाती घेतला आहे. आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त लोकांना हे ‘कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन’चे (सीपीआर) प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते वाहतूक पोलीस, वाहन चालक, पत्रकार, डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले आहे.
वृक्षारोपणाचा संकल्प
‘इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियालॉजिस्ट, नागपूर शाखेने ‘सीपीआर’ प्रशिक्षणासोबतच वृक्षारोपणाचा संकल्पही केला आहे. आतापर्यंत पाच हजारांवर झाडे लावण्यात आली. किती झाडे लावणार हे लक्ष्य ठेवले नसले तरी संस्थेकडून जास्तीत जास्त झाडे लावण्याचे व त्याला जगविण्याचा संकल्प केला आहे, असे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.