ब्रह्मपुरीच्या वाघिणीच्या सुटकेवर निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:00 AM2019-06-05T11:00:40+5:302019-06-05T11:02:03+5:30
मानव-वन्यजीव संघर्षात तुरुंगात बंद असलेल्या वन्यप्राण्यांंना जंगलात सोडण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. बैठकीत ब्रह्मपुरीच्या मेंडकी भागात बेशुद्ध केलेल्या वाघिणीला परत जंगलात सोडायचे काय? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानव-वन्यजीव संघर्षात तुरुंगात बंद असलेल्या वन्यप्राण्यांंना जंगलात सोडण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. बैठकीत ब्रह्मपुरीच्या मेंडकी भागात बेशुद्ध केलेल्या वाघिणीला परत जंगलात सोडायचे काय? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
सूत्रांनुसार मेंडकी भागात झालेल्या घटनात तुरुंगात बंद असलेल्या वाघिणीचा काहीच दोष नसल्याच्या निष्कर्षावर समिती पोहोचली आहे. परंतु तिला सोडण्याचा अंतिम निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना अहवाल सोपविल्यानंतर होणार आहे. मागील काही महिन्यांपासून मेंडकी परिसरात २ वर्षाची वाघीण ई १ ने दहशत निर्माण केली होती. तिच्या हल्ल्यामुळे मेंडकी भागात मोहफूल, तेंदूपत्ता व्यवसाय ठप्प पडला होता. तिला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागावर दबाव आणला होता. आदेश जारी झाल्यानंतर व्हेटरनरी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि त्यांच्या चमूने ३१ मे रोजी वाघिणीला बेशुद्ध करून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. आता या वाघिणीला जंगलात सोडण्यासाठी समितीची बैठक झाली. बैठकीत पेंच क्षेत्राचे संचालक रविकिरण गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वन संरक्षक रामाराव, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, डॉ. अरुण खोलकुटे, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी गिरीश वशिष्ठ, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.
या वाघिणीचा रेडिओ कॉलर काढण्यात आला नाही. या आधारे सर्व तांत्रिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. वाघिणीच्या कॉलरचे रीडिंग तपासण्यात आले. यासोबतच वाघिणीचे हल्ले वन क्षेत्रातच झाल्याची पुष्टी होत आहे. एकही हल्ला वाघिणीने गावात जाऊन केला नाही. त्यामुळे तिला बंदिस्त ठेवण्यावर समर्थन करण्यात आले नाही.