श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:53+5:302021-07-12T04:06:53+5:30
नागपूर : बरेच लाेक श्रद्धा वेगळी व अंधश्रद्धा वेगळी असे बाेलतात पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता ...
नागपूर : बरेच लाेक श्रद्धा वेगळी व अंधश्रद्धा वेगळी असे बाेलतात पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धिप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या "अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका" या ई मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील (भाई)होते. डाॅ. मनाेहर म्हणाले, अनिसच्या कार्यकर्त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, अशा सर्वच क्षेत्रातील अंधश्रद्धांना भिडले पाहिजे. अंधश्रद्धा या ऐतखाऊ लोकांचं अर्थशास्त्र आहे. अंधश्रद्धानी जागतिक पातळीवरही मानवी बुद्धीवर आक्रमण केलेले आहे. अंधश्रद्धा या बुद्धिचुकार लोकांचे विश्रामगृह आहे", अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्धारानं अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहे. 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' ही सामाजिक परिवर्तनासाठी, विवेक विचार रुजविण्यासाठी उपयुक्त ठरेल. भयमुक्त समाज करण्याचे काम ही पत्रिका करेल. ही पत्रिका चालवताना अनेक अडचणी येतील मात्र या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य लोकच तुम्हाला देतील. सर्व धर्ममार्तंड हे समाजव्यवस्थेच्या धुरीणांचे चाकर असतात. त्यांच्या मदतीने हे धुरीण अंधश्रद्धांचा फैलाव करतात. लोकांनी विचार करणे, प्रश्न विचारणे हे व्यवस्थेच्या धुरीणांना अडचणीचे असते. त्यामुळे लोकांची विचारशक्ती नष्ट करतात आणि मग लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात.
मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे संपादकीय भूमिका मांडली. डॉ दीपक बाविस्कर यांनी प्रास्ताविक व डॉ. मांतेश हिरेमठ यांनी संचालन केले. राजेंद्र फेगडे यांनी आभार मानले. यावेळी उत्तम जोगदंड, राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप पाटकर, प्रा.शामराव पाटील, प्रधान सचिव संजय बनसोडे, माधव बावगे, सुशीला मुंडे, नंदकिशोर तळाशीकर, गजेंद्र सुरकार, ठकसेन गोराणे, संजय शेंडे, सुधाकर काशीद, विनायक सावळे, सुरेखा भापकर, प्रा.मेश्राम, प्रा. एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.