संसदेत धोरणांवर चर्चाच होत नाही

By admin | Published: March 26, 2017 01:48 AM2017-03-26T01:48:18+5:302017-03-26T01:48:18+5:30

सार्वजनिक धोरणे तयार करण्याची जबाबदारी संसदेवर असते. कुठलेही धोरण ठरविताना त्यावर सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे.

There is no discussion in the policies of Parliament | संसदेत धोरणांवर चर्चाच होत नाही

संसदेत धोरणांवर चर्चाच होत नाही

Next

मोहम्मद सलीम : लोकप्रशासन विभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
नागपूर : सार्वजनिक धोरणे तयार करण्याची जबाबदारी संसदेवर असते. कुठलेही धोरण ठरविताना त्यावर सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने धोरणांवर चर्चाच होताना दिसून येत नाही. याबाबत लोकप्रतिनिधींनी विचार करणे आवश्यक आहे, असे परखड मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व खासदार मोहम्मद सलीम यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातर्फे २५ ते २७ मार्च या कालावधीत ‘पब्लिक पॉलिसी अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन : इश्यूज् अ‍ॅन्ड कन्सर्न्स’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
गुरुनानक भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्राच्या ‘बोर्ड आॅफ गव्हर्नर्स’चे अध्यक्ष डॉ.जॉन मॅरी कॉझ्या, माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, हे प्रामुख्याने उपस्थित होते. मोहम्मद सलीम यांनी केंद्र शासनावर यावेळी जोरदार टीका केली. देशातील ५९ टक्के संपत्ती केवळ १ टक्के लोकांकडे आहे. केंद्र शासनाने तर आता नियोजन आयोगदेखील मोडीत काढला आहे. त्याची जागा नीती आयोगाने घेतली आहे. मात्र धोरण निर्मितीच्या वेळी चर्चा होत नाहीत. संसदेत वित्त विधेयकातील ४० सुधारणा काही मिनिटांत चर्चेशिवाय मंजूर झाल्या. केंद्राच्या धोरणांमुळे देशातील भूमी, आकाश, पाणी यांचा अक्षरश: लिलाव सुरू आहे, असे सलीम म्हणाले. ज्ञान आणि प्रशासन यांच्या संयुक्त संगमातून सार्वजनिक धोरणांची निर्मिती व्हायला हवी. मात्र, जनता व धोरणांमध्ये ‘तलाक’ झाला आहे, या शब्दांत त्यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली. धोरणांची निर्मिती व त्यांची अंमलबजावणी यात प्रशासनाचीदेखील मोठी भूमिका असते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करण्याची किंवा काहीतरी वेगळे करण्याची इच्छाच नसते, असेदेखील ते म्हणाले. विभागप्रमुख डॉ.निर्मल कुमार सिंह यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

मोदींचे उद्दिष्ट प्रामाणिक
यावेळी सतीश चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. नोटाबंदीचा मोदी यांचा निर्णय योग्य होता. त्यांच्या निर्णयात मला काहीच गैर वाटत नाही. कारण त्यामागचा उद्देश हा प्रामाणिक होता. त्याची अंमलबजावणी नीट न झाल्याने जनतेला त्रास झाला. धोरण आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चतुुर्वेदी यांनी केले.
शैक्षणिक कार्यक्रमात राजकीय पाहुणे का?
नियोजित वेळापत्रकानुसार या कार्यक्रमाला नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.मॉंटेकसिंह अहलुवालिया हे मुख्य अतिथी राहणार होते. मात्र ऐनवेळी मोहम्मद सलीम यांना बोलविण्यात आले. याबाबत सलीम यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. पत्रिकेतदेखील त्यांचे नाव नव्हते. शैक्षणिक क्षेत्राशी आपला फारसा संबंध नाही. मी विद्यापीठांमध्ये फारसा जात नाही. त्यामुळे मला येथे बोलाविल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी भाषणात शैक्षणिक मुद्द्यांऐवजी राजकीय बाबींवर जास्त भाष्य केले. यावर उपस्थितांच्या भुवयादेखील उंचावल्या. विद्यापीठाच्या कार्यक्रमांना राजकीय पाहुणे बोलावून राजकीय मंच का उपलब्ध करून देण्यात येतो, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा कार्यक्रम रद्द करण्यावरुन निर्माण झालेला वाद शांतही झालेला नाही हे विशेष.

Web Title: There is no discussion in the policies of Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.