नागपुरात एकही आयसीयू व व्हेंटीलेटर बेड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:29+5:302021-04-24T04:07:29+5:30
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. असे असताना गंभीर रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणेही कठीण झाले आहे. ...
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. असे असताना गंभीर रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणेही कठीण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत नागपूर शहरातील एकाही हॉस्पिटल किंवा कोविड केअर सेंटरमध्ये एकही आयसीयू बेड किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. नातेवाईक गंभीर रुग्णांना भरती करण्यासाठी दिवसभर हॉस्पिटलला फोन करीत होते. चकरा मारत होते. मात्र, त्यांना बेड मिळत नव्हता.
नागपुरात १४० खासगी हॉस्पिटल व महापालिका तसेच शासकीय असे १२ हॉस्पिटल आहेत. याशिवाय नऊ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. मात्र, शुक्रवारी सकाळी या सर्व हॉस्पिटलमध्ये फक्त ४८ ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे महापालिकेने जाहीर केले. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांनी चौकशी केली असता, बहुतांश ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचाच प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत मेडिकलमध्ये सहा, मेयो तीन, शालिनीताई मेघे हॉस्पिटल चार व मोगरे नर्सिंग होममध्ये सात बेड उपलब्ध असल्याचा दावा महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात हा दावाही फोल ठरला.