रेमडेसिविर नसले तरी घाबरण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:20+5:302021-04-23T04:09:20+5:30
मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - रेमडेसिविरची कमतरता असल्याने जनतेमध्ये अस्वस्थता असली तरी प्रत्यक्षात हे इंजेक्शन जीवनरक्षक ठरू ...
मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रेमडेसिविरची कमतरता असल्याने जनतेमध्ये अस्वस्थता असली तरी प्रत्यक्षात हे इंजेक्शन जीवनरक्षक ठरू शकते असे नाही, हे शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे विविध देशात केलेल्या संशोधनातदेखील ही बाब समोर आली आहे. रेमडेसिविरमुळे मृत्यूदरावर फारच कमी परिणाम होतो. अनेक देशात तर रेमडेसिविरच्या वापराला मनाई करण्यात आली आहे.
रेमडेसिविर हे जीवनरक्षक इंजेक्शन नसले तरी यामुळे रुग्णालयात राहण्याचा कालावधी नक्कीच कमी होण्यास मदत मिळते. फॅव्हिपिरॅव्हिर हे देखील ॲन्टिव्हायरल असून ते गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे, मात्र दवाखान्यात दाखल रुग्णांसाठी जास्त फायद्याचे नाही. विविध औषधे एकत्रित करून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे एका औषधाला जीवनरक्षक म्हणता येणार नाही, असेदेखील वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्टेरॉईड, ॲन्टिव्हायरल आणि ब्लड थिनर्स यांचा उपयोग होतो. जर रेमडेसिविर बाजारात उपलब्ध नाही तर इतर दोन औषधांचा उपयोग होऊ शकतो. कोरोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवर रेमडेसिविर प्रभावी नाही. यासंदर्भात कुठलेही ठोस संशोधन उपलब्ध नाही व हे जीवनरक्षक इंजेक्शन आहे याचा पुरावा नाही, असे डॉ. संजय दर्डा यांनी सांगितले.
रुग्णांना डेक्सामेथॅसोन, स्टेरॉईड दिले जाते. यामुळे लंग फायब्रोसिस आणि इतर गंभीर दुष्परिणाम टाळता येतात. रेमडेसिविर व डेक्सामेथॅसोन हे एकमेकांसाठी पूरक आहेत. रेमडेसिविरमुळे मृत्यू टाळता येत नाही. मात्र गंभीर स्थिती टाळता येऊ शकते. रेमडेसिविरमुळे विषाणू नष्ट होतो, तर डेक्सामेथॅसोन विषाणूचा प्रभाव नष्ट करतो. हे दोन वेगवेगळे प्रभाव असलेले दोन वेगळे औषधं आहेत. त्यामुळेच जर रुग्णांसाठी बाजारात रेमडेसिविर मिळत नसेल तर अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. रुग्णांवर इतर इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार होऊ शकतो, अशी माहिती डॉ. जय देशमुख यांनी दिली.
रेमडेसिविरकडून जास्त अपेक्षा करू नये. ॲन्टिव्हायरल औषधे हे फार प्रभावी नाहीत. रेमडेसिविर हे देखील आयुष्य वाचविण्यासाठी प्रभावी नाही. जीव वाचविण्यासाठी स्टेरॉईडचा वापर होऊ शकतो. जर रेमडेसिविर उपलब्ध नसेल तर डॉक्टर इतर औषधांना एकत्रितपणे वापरून उपचार करू शकतात, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. दीप्ती चंद यांनी केले.