बाबासाहेबांचा नवीन खंड यंदाही नाहीच
By admin | Published: April 14, 2016 03:05 AM2016-04-14T03:05:41+5:302016-04-14T03:05:41+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही.
चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कारभारावरच संशय : बाबासाहेबांच्या विचारधनापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान
आनंद डेकाटे नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही. बाबासाहेबांचे अप्रकाशित मूळ साहित्य प्रकाशित न करून त्यांच्या विचारांपासून सामान्य नागरिकांना वंचित ठेवण्याचा घाट डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीने घातला आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुस्तकरूपाने समाजासमोर आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. या ३६ वर्षात केवळ २२ खंड व २ संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. सन २००४ पासून बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही खंड प्रकाशित झालेला नाही. सन २००६ व २०१० प्रकाशित खंड २१ व २२ हे चुका व त्रुटीमुळे वादग्रस्त ठरले. यानंतर सुधारित खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्याचे तब्बल ४२ खंड प्रकाशित होणार होते. त्यापैकी केवळ अर्धे खंड प्रकाशित झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३० ते १९३३ या कालावधीत गोलमेज परिषदेविषयी निर्माण केलेल्या सात समित्यांचे सदस्य होते. इतकेच नव्हे तर व्हॉईसरॉयच्या शासनात १९४२ ते १९४६ या कालावधीत श्रममंत्री असताना त्यांच्याकडे ११ महत्त्वाची खाती होती. त्याचप्रमाणे भारतीय राज्य घटना तयार होत असताना ज्या दहा विविध उपसमित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. यातील कामगिरी वाखाणल्या गेली आहे. यावर अनेक ग्रंथ तयार होऊ शकतात, परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त बाबासाहेबांचे विचार प्रत्येक माणसात रुजविण्यासाठी हे वर्ष समता वर्ष म्हणून शासनातर्फे साजरे करण्यात येत आहे.
त्यासाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्याचा नवीन खंड या वर्षी सुद्धा प्रकाशित न झाल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे.
नव्याने भाषांतराची गरज काय?
नागपूर : दिवंगत वसंत मून यांनी या खंडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करून ठेवला आहे. तो छपाईसाठी पाठवण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. गेल्या १० वर्षापासून हा खंड मुद्रित तपासणीसाठी पडून आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण खंड मराठी भाषेत उपलब्ध असताना केवळ प्रा. प्रकाश सिरसट यांच्याकडून या एका प्रकरणाचा अनुवाद करण्यात आला आहे. तेव्हा संपूर्ण खंड मराठीत उपलब्ध असताना नव्याने अनुवादाची गरज काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केवळ ९० पानांची पुस्तिका
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले व वादग्रस्त खंड अॅनिहिलेशन आॅफ कास्ट (जातिव्यवस्थेचे निर्मूलन) म्हणजे १९३६ साली लाहोर येथे जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनातील नियोजित अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी तयार केलेले लिखित भाषण होय.
या भाषणातील हिंदू धर्माची परखड व कठोर चिकित्सा पाहून आयोजकांनी ते अधिवेशनच रद्द केले होते. पुढे हेच भाषण पुस्तकरूपाने १५ मे १९३६ साली प्रकाशित करण्यात आले. याच आधारे महराष्ट्र शासनाच्या प्रकाशन समितीने खंड-१ म्हणून भारतातील जाती, जात निर्मूलनासहित एकूण ११ प्रकरणांसह १४ एप्रिल १९७९ रोजी प्रकाशित केले. या खंडाला प्रचंड मागणी असूनही ३७ वर्षात एकाही खंडाचे पुनर्मुद्रण करण्यात आलेले नाही.
या खंडाला ७५ वर्षे पूर्ण झल्याबद्दल सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी १४ एप्रिल २०१३ रोजी या संपूर्ण खंडातील प्रकरण-२ मधील ‘अॅनिहिलेशन आफ कास्ट वीथ रिप्लाय टू महात्मा गांधी बाय डॉ. बी.आर. आंबेडकर’ या शीर्षकाची ७२ पानांची इंग्रजी पुस्तिका झेरॉक्स रूपाने प्रकाशित केली होती. आता तीन वर्षांनी याच मजकुराचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीने कुठलाही नवीन ग्रंथ प्रकाशिन न करता केवळ हे ९० पानाचे पुस्तक प्रकाशित करून आंबेडकरी जनतेला फसवण्याचा प्रकार केला आहे.