सतरंजीपुऱ्यात मिलिटरीशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:30 AM2020-04-21T00:30:10+5:302020-04-21T00:32:12+5:30
सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत. हा परिसर पोलीस विभागाने सील केलेला असूनदेखील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे हा परिसर मिलिटरीच्या स्वाधीन करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना पत्रही लिहिले आहे. सतरंजीपुरा येथील परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात स्थिती नियंत्रणाबाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही खोपडे यांनी म्हटले आहे.