रक्तदानासारखे दुसरे पुण्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:28+5:302021-07-09T04:07:28+5:30
नागपूर : सर्वात पवित्र दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रुग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरते. रक्तदानासारखे दुसरे पुण्य ...
नागपूर : सर्वात पवित्र दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रुग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरते. रक्तदानासारखे दुसरे पुण्य नाही. यामुळे प्रत्येक दात्यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी येथे केले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही राज्यव्यापी रक्तसंकलन मोहीम मोठ्या स्तरावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ताजाबाद शरीफ नागपूरच्या वतीने बाबा ताजुद्दीन यांच्या ‘छब्बीसवी’निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ट्रस्टचे सचिव ताज अहमद अली, अहमत राजा, फारूख बावला, मुस्तफा टोपीवाला, आफताब खोजा, इमरान खान, मोबिन भाई, सलीम भाई यांच्यासह ट्रस्टचे सर्व कर्मचार उपस्थित होते. यावेळी ६३ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येईल, असेही प्यारे खान यांनी आवर्जून सांगितले.
............................................................................................................................
मानवी रक्ताला दुसरा पर्याय नाही
-डॉ. अविनाश गावंडे : ‘एमएसएफ’च्या जवानांचे स्वयंस्फूर्तीने रक्तदान
नागपूर : मेडिकलमध्ये केवळ विदर्भातूनच रुग्ण येत नाही तर, आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे दर दिवसाला ३० ते ४० रक्त पिशव्यांची गरज पडते. विज्ञानामुळे रक्तघटक वेगळे करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मात्र, विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. म्हणूनच प्रत्येकाने मेडिकलच्या रक्तपेढीत रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी येथे केले.
‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत मेडिकलमधील ‘महाराष्ट्र सुरक्षा बल’तर्फे (एमएसएफ) गुरुवारी मेडिकलच्या रक्तपेढीत आयोजित रक्तदान शिबिरात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रभारी अधिष्ठाता डॉ. दीप्ती जैन, ‘एमएसएफ’चे सहसंचालक किशोर पाडवी उपस्थित होते. रक्तपेढीचे डॉ. पौर्णिमा कोडाटे व डॉ. प्रवीण मेश्राम यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. यावेळी ड्युटीवर असणाऱ्या जवानांनी वेळ काढून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. विशेष म्हणजे, रक्तदानात महिला जवानांचा पुढाकार उल्लेखनीय ठरला.