गृहविलगीकरणातील मृत्यूची पोर्टलवर नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:08 AM2021-05-20T04:08:07+5:302021-05-20T04:08:07+5:30

नागपूर : प्रशासनातर्फे दररोज कोरोनाचा अहवाल पोर्टलवर अपडेट करून शासनाकडे व प्रसिद्धिमाध्यमाकडे पाठविण्यात येतो. या अहवालात दररोज झालेल्या ...

There is no record of death in house separation on the portal | गृहविलगीकरणातील मृत्यूची पोर्टलवर नोंदच नाही

गृहविलगीकरणातील मृत्यूची पोर्टलवर नोंदच नाही

Next

नागपूर : प्रशासनातर्फे दररोज कोरोनाचा अहवाल पोर्टलवर अपडेट करून शासनाकडे व प्रसिद्धिमाध्यमाकडे पाठविण्यात येतो. या अहवालात दररोज झालेल्या चाचण्या, आढळलेले पॉझिटिव्ह, कोरोनातून बरेच झालेले रुग्ण आणि आजचे मृत्यू असा अहवाल दिला जातो. प्रशासनातर्फे पोर्टलवर अपडेट करण्यात येणारे मृत्यूचे आकडे आणि कोरोनाचे प्रत्यक्ष झालेले मृत्यू या माहितीत मोठी तफावत आहे. कारण गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद कोरोना वॉर रूममध्ये होत नाही. कोरोना वॉर रूममध्ये केवळ रुग्णालयातून झालेल्या मृत्यूच्या नोंदी घेऊन तेच आकडे अपडेट केले जात असल्याची माहिती आहे.

- प्रशासनाकडून आजपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी

जिल्ह्यात एकूण मृत्यू - ८६५७

शहरातील मृत्यू - ५१६२

ग्रामीण भागातील मृत्यू - २२१२

- शहरातील घाटावर गृहविलगीकरणातील मृत्यूची नोंद

शहरात गृहविलगीकरणात असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू घरीच झाल्यास, त्याच्यावर अंत्यसंस्कार महापालिकेच्या पथकाकडून करण्यात येतो. शहरातील दहन घाटावर मृत्यूच्या तीन प्रकारच्या नोंदी केल्या जातात. यात सामान्य मृत्यू, रुग्णालयातील कोरोनाचे मृत्यू व घरीच कोरोनामुळे झालेला मृत्यू अशा नोंदणी असतात. या तीनही नोंदी झोन कार्यालयाकडे दररोज पाठविल्या जातात. परंतु घरी झालेल्या कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी प्रसिद्ध केली जात नाही. प्रशासन केवळ रुग्णालयातीलच मृत्यूची नोंद करते. यासंदर्भात लोकमतने यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या मृत्यूची आकडेवारी व प्रत्यक्षात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. यात प्रशासनाने दिलेल्या मृत्यूच्या आकडेवारीपेक्षा कोरोनामुळे दोन ते अडीचपट मृत्यू जास्त होत असल्याचे निदर्शनास आले होते.

- ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतीत होते नोंद

प्रशासन ग्रामीण भागातील जी मृत्यूची आकडेवारी देते, ते आकडे ग्रामीण भागातील जे रुग्ण शहरातील रुग्णालयात भरती झालेत व त्यांचा मृत्यू झाला, अशांचीच नोंद ग्रामीणचे मृत्यू म्हणून करते. पण ग्रामीणमध्ये गृहविलगीकरणात झालेल्या मृत्यूची नोंद अंत्यसंस्कार झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात केली जाते. ग्रामपंचायतीतून मृत्यूचे आकडे पंचायत समितीला व नंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे येतात. शहरात सामान्य मृत्यू झाला तरी दहन घाटावर आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट मागण्यात येते. ग्रामीण भागात तसे होत नाही. त्यामुळे बरेच मृत्यू कोरोनामुळे झाले असले तरी त्याची कागदोपत्री नोंदच होत नाही.

- महापालिका व जिल्हा परिषदेची कोरोना वॉर रूम

शहरासाठी महापालिकेने व ग्रामीणसाठी जिल्हा परिषदेने कोरोना वॉर रूम सुरू केली आहे. दररोज होणाऱ्या टेस्टिंग, निघणारे पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात झालेले मृत्यू याची नोंद वॉर रूममधून घेतली जाते. पण या वॉर रूमकडे गृहविलगीकरणात मृत्यू झालेल्यांची नोंद होत नाही. कारण घाटावर व ग्रामपंचायतीत होणाऱ्या मृत्यूच्या नोंदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जन्ममृत्यू विभागात होतात.

- तर फटका बसू शकतो

पोर्टलवर कमी मृत्यूची नोंद झाल्यास आकडेवारीनुसार केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये फरक पडू शकतो. गंभीर स्थिती असतानाही त्याची नोंद न होण्याची शक्यता बळावते. गृहविलगीकरणात मृत्यू झाल्यानंतर महापालिका केवळ अंत्यसंस्कारांचे सोपस्कार पार पाडते. नंतर त्या वस्तीकडे अथवा घराकडे दुर्लक्ष करते, तिथे विचारणाही करीत नाही. अशी काही उदाहरणेही आहेत.

- कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू नागपूर तालुक्यात

तालुका मृत्यू

नागपूर ३३८

भिवापूर ३९

हिंगणा २५०

कळमेश्वर १५४

कामठी ३०७

काटोल १६६

कुही ९३

मौदा ९६

नरखेड ९४

पारशिवनी १३४

रामटेक ९४

सावनेर ३१९

उमरेड १३२

- काय म्हणतो आरोग्य विभाग

ग्रामीणमधून शहरातील रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद लगेच वॉर रूममध्ये घेण्यात येते. परंतु गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद टीएचओ कार्यालयात होते. त्याची माहिती वॉर रूमपर्यंत उशिरा येत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: There is no record of death in house separation on the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.