तोतया अधिकाऱ्याचा छडा नाही : अनेक व्यापाऱ्यांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:10 AM2021-06-16T00:10:18+5:302021-06-16T00:10:45+5:30
no search of fake officer कारवाईचा धाक दाखवत अनेक व्यापाऱ्यांना गंडविणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात बजाजनगर पोलिसांना अद्याप यश आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारवाईचा धाक दाखवत अनेक व्यापाऱ्यांना गंडविणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात बजाजनगर पोलिसांना अद्याप यश आले नाही. २९ मेच्या दुपारी फूड डिपार्टमेंटचा अधिकारी बोलतो, असे सांगून कारवाईचा धाक दाखवत देवनगर चाैकातील गणेश मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाला एका आरोपीने ३० हजारांनी गंडविले.
शशांक राकेश अग्रवाल (वय ३६) यांचे देवनगर चाैकात गणेश मेडिकल स्टोअर्स आहे. त्यांना २९ मेच्या दुपारी फूड डिपार्टमेंटच्या तोतया अधिकाऱ्याचा फोन आला. मेडिकल स्टोअर्समधून मुदतबाह्य बोर्नव्हिटा विकले जात असल्याचे सांगून तोतया अधिकाऱ्याने अग्रवाल यांना धमकावले आणि त्यांना दंड म्हणून ३० हजारांची रक्कम ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर अग्रवाल यांनी शनिवारी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा नाव, पत्ता पोलिसांना कळाला आहे. या भामट्याने आधीही अनेक व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे गंडविल्याचे पुढे आले आहे. तो मिमिक्री आर्टिस्ट असून अनेकांचे नाव सांगून त्यांचे आवाज काढतो आणि त्या आधारे बेमालूमपणे रक्कम उकळतो, असे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे पोलीस सूत्रांचे सांगणे आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असा दावाही पोलिसांनी केला आहे.