ग्रामीण भागात घाटावर कोरोना मृतदेहांची स्वतंत्र नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:43+5:302021-05-05T04:12:43+5:30
नागपूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सारख्या प्रमाणातच कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागात कोरोनावर उपचाराची यंत्रणा नसल्याने अत्यवस्थ ...
नागपूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सारख्या प्रमाणातच कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागात कोरोनावर उपचाराची यंत्रणा नसल्याने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना शहरात उपचारासाठी आणावे लागत आहे. पण शहरातील रुग्णालयेही गेल्या महिनाभरापासून हाऊसफुल्ल असल्याने ग्रामीण रुग्णांचा घरातच मृत्यू होत आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंद केली जाते; परंतु ग्रामीण भागातील अनेक गावांतील घाटांवर मृत्यू कशाने झाला याची विचारणा करणारे कोणीच नसल्याने कोरोनाच्या मृतदेहांची स्वतंत्र नोंद होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत शहराच्या तुलनेत घट दिसून येत आहे. ‘लोकमत’च्या चमूने जिल्ह्यातील काही गावांत जाऊन कोरोनाच्या मृतदेहांची नोंद होते का, याचा आढावा घेतला. त्यात उघडकीस आलेल्या काही बाबी...
- दृष्टिक्षेपात
ग्रामपंचायती - ७७०
गावे - १,८७२
लोकसंख्या - १७,३८,२००
ग्रामीण रुग्णालय - ९
प्राथमिक आरोग्य केंद्र - ४९
आरोग्य उपकेंद्र - ३१६
- गावांमध्ये काय आहे परिस्थिती
ग्रामीण भागात अंत्यसंस्काराची स्वतंत्र व्यवस्था फार कमी गावांमध्ये आहे. बहुतांश गावांत नदीच्या काठावर अंत्यविधी आटोपला जातो. काही गावांत स्मशानभूमी आहे; पण सोयीसुविधा नाही. ग्रामीण भागात होणाऱ्या कोरोनाच्या चाचण्या आणि पॉझिटिव्हची संख्या ही ४० टक्केच्या जवळपास आहे. अजूनही लोक कोरोनाची चाचणी करायला पुढे येत नाही. आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यात येत असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. हे काही गावांत दिसून येते. आरोग्याची विशेष यंत्रणा नाही. शहरातील मेडिकल, मेयोची भीती ग्रामस्थांना आहे. कोरोना सांगितल्यास मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हाती मिळत नसल्याने माहिती लपविली जात आहे.
- घाटांवर मृतदेहांची स्वतंत्र नोंद घेण्याची व्यवस्था नाही
ग्रामीण भागात घाटांचीच व्यवस्था नसल्याने, मृतदेहांची घाटावर नोंद घेण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. बहुतांश गावातील हीच परिस्थिती आहे. घरात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी येणारी यंत्रणा तोकडी आहे. त्या प्रक्रियेला वेळही भरपूर लागत असल्याने, या भानगडीत बहुतांश नातेवाइक पडत नाही. त्यामुळे अंत्ययात्राही निघतात.
- ग्रामपंचायत देते कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला
अंत्यसंस्कारापूर्वी ग्रामस्थांनी कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोय करण्यात येते, असे सरपंच सांगतात; पण ग्रामीण भागात शहरासारखी व्यवस्था नाही. ग्रामपंचायत मृत्यूचा दाखला देताना कोरोनाची नोंद करते; पण ग्रामस्थांनी ते सांगणे गरजेचे आहे.
- काय म्हणतात सरपंच
आमची ग्रामपंचायत शहराला लागून आहे. कोरोनाचे रुग्ण शहरातील रुग्णालयात उपचार घेतात. त्यांचा मृत्यू झाल्यास शहरातीलच घाटावर अंत्यसंस्कार होतात. गावातील घाटावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार झाले नाही.
नरेश भोयर, सरपंच, पिंपळा
- आतापर्यंत १४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ८० नागरिकांना कोरोना झाला आहे. कोरोना पाझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यास ग्रामपंचायत अंंत्यसंस्कारासाठी मदत करते. काही नागरिक स्वत: अंत्यसंस्कार करतात.
- प्रगती पंकेश माटे, सरपंच, पंचाळा बु., ता. रामटेक
- गावातील केवळ एका व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. तो बुटीबोरी येथील दवाखान्यात दाखल होता. त्याचे पार्थिव गावात न आणता तिकडेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
जितेंद्र देवरावजी बोटरे, सरपंच, कान्होलीबारा, ता. हिंगणा
- आमच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप कमी आहे. अंत्यसंस्कारास पुरेपूर मदत केली जाते.
- मायाताई इंद्रपाल गोरले, सरपंच, बाबुळवाडा, ता. पारशिवनी
- तालुका आरोग्य अधिकाऱ्याला कळविले जाते. तालुक्यावरून शववाहिनी येते. मृतदेहाला दुहेरी पीपीई कीटमध्ये बाधल्यानंतर कर्मचारीच मृतदेहास सरणापर्यंत घेऊन जातात.
- अनिल बाळकृष्ण बांदरे, सरपंच, खेडी - गोवारगोंदी, ता. नरखेड
- गावातील केवळ एक व्यक्तीचे ऑक्सिजन कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेतेवेळी मृत्यू झाला. आम्ही त्याचे पार्थिव सरळ घाटावर घेऊन गेलो. सर्व साहित्य बोलावून अंत्यविधी केला.
- चिंतामण मदनकर, सरपंच, रेवराल, ता. मौदा
- कोरोनाचे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार हे नागपूर महापालिकेकडूनच केले जातात. जे रुग्ण घरी दगावतात त्यांना घाटावर नेण्याकरिता नागपूरहून शववाहिका बोलावण्यात येते.
- नरेंद्र धानोले, सरपंच, कोराडी, नागपूर ग्रामीण
- कोरोना रुग्ण अतिगंभीर झाल्यास तो तहसील किंवा जिल्हास्तरावरील रुग्णालयात दाखल करण्यात येते. तिथे मृत्यू झाल्यास परस्पर व्हिलेवाट लावण्यात येते. आजपर्यंत तरी गावात कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार झालेला नाही.
- नलिनी जानराव राऊत, सरपंच, रिधोरा, ता. काटोल
- टेभूरडोह गावात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील दोन जण शहरातील रुग्णालयात मृत झाले. दोन व्यक्तींचे गावात नियमाचे पालन करून अत्यंसंस्कार झाले.
दीपक सहारे, सरपंच, टेभुरडोह, ता. सावनेर
- ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकाचाही कोरोनाने मृत्यू झालेला नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी काही वेगळी व्यवस्था केली नाही.
जितू लुटे, सरपंच, वडेगाव (मांढळ), ता. कुही
- शासनाच्या निर्देशानुसार अंत्यसंस्कार करण्यात येईल. पण गावात कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार झालेले नाही.
मंगेश गोतमारे, सरपंच, घोराड, ता. कळमेश्वर