पारडी उड्डाण पूल व नादुरुस्त रस्त्यांवर साधी चर्चाही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:20 PM2018-08-22T23:20:14+5:302018-08-22T23:21:20+5:30
रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवसाच्या पावसात मार्गावर पुन्हा खड्डे पडले. पूर्व नागपुरातील सर्वच नागरिक यामुळे त्रस्त आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनाही याची जाणीव आहे. असे असूनही मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत खोपडे यावर काहीच बोलले नाही. गडकरी यांनीच अत्याधुनिक मार्केट व पारडी बाजाराची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवसाच्या पावसात मार्गावर पुन्हा खड्डे पडले. पूर्व नागपुरातील सर्वच नागरिक यामुळे त्रस्त आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनाही याची जाणीव आहे. असे असूनही मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत खोपडे यावर काहीच बोलले नाही. गडकरी यांनीच अत्याधुनिक मार्केट व पारडी बाजाराची माहिती जाणून घेतली.
पारडी बाजाराचे काय झाले, असा प्रश्न गडकरी यांनी खोपडे यांना केला. खोपडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे इशारा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पासाठी चार एकर जागेची गरज आहे. महापालिकेने अद्याप ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरित केलेली नाही. वन विभाग व खासगी जमिनीमुळे हस्तांतरण न झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर गडकरी यांनी बाजारासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचे निर्देश दिले.
पारडी बाजाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतरही आमदारांनी पारडी उड्डाण पुलाच्या संथ गतीच्या व मार्गावरील खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला नाही. बैठकीनंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने कृष्णा खोपडे यांना पारडी उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात विचारणा केली असता, काम संथ गतीने सुरू असल्याची कबुली त्यांनी दिली.
रस्त्यांवरील खड्ड्यांना मेट्रो रेल्वे जबाबदार असल्याची सांगण्यात आले. परंतु पारडी चौक ते कळमना मार्गाशी मेट्रो रेल्वेचा कोणताही संबंध नाही. खोपडे यांनी रस्त्याच्या नादुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला असता तर रस्ता दुरुस्त होण्याला मदत झाली असती.
साई प्रकल्पाबाबत आग्रही भूमिका
बैठकीत राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण(साई) चा विषय चर्चेसाठी होता. या प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांनी दिशानिर्देश दिले. ७१.४२ लाखांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबतच्या पत्रासंदर्भात मात्र खोपडे यांनी गडकरी यांना मािहती दिली. अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसतानाही साई प्रकल्पाबाबत खोपडे आग्रही दिसले.