माझ्या गीताचे रोपटे बहरेल अशी जमीनच नाही
By admin | Published: July 8, 2017 02:28 AM2017-07-08T02:28:14+5:302017-07-08T02:28:14+5:30
आज ३६ वर्षे झालीत मी चित्रपटांसाठी गाणी लिहितोय. ‘नजर के सामने जिगर के पास...’ ते ‘मुश्कील बडी है रस्म- ए- मोहब्बत...’ या माझ्याच रचना आहेत.
गीतकार समीर : ‘चार बोटल वोडका’ ऐकून मन व्यथित होत असल्याची खंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज ३६ वर्षे झालीत मी चित्रपटांसाठी गाणी लिहितोय. ‘नजर के सामने जिगर के पास...’ ते ‘मुश्कील बडी है रस्म- ए- मोहब्बत...’ या माझ्याच रचना आहेत. परंतु काळ बदलला तसे पोटासाठी मलाही बदलावे लागले. आता जेव्हा मी ‘सरकाय लेव खटिया’सारखी गाणी लिहितो तेव्हा श्रोत्यांना हा बदल पचवणे अवघड जाते. परंतु माझ्या गीताचे रोपटे बहरेल अशी जमीनच आज उपलब्ध नाही त्याला मी तरी काय करणार, अशी खंत प्रसिद्ध गीतकार समीर अर्थात समीर अंजान पाण्डेय यांनी व्यक्त केली. एका चॅरिटेबल शोसाठी नागपुरात आले असता शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भारतीय संगीताच्या इतिहासापासून तर वर्तमान राजकीय स्थितीपर्यंत त्यांनी अतिशय मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
समीर पुढे म्हणाले, चित्रपटामध्ये व्यक्तिरेखा, कलाकार यांना डोळ्यासमोर ठेवून प्रसंगानुरूप व दिग्दर्शकाची मागणी डोळ्यासमोर ठेवून गीतलेखन करणे ही एक प्रकारची कसरत असते. मी ती अभ्यासपूर्वक जमविली. यात मला आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, अन्नू मलिक यांची मोलाची साथ लाभली. परंतु आता चित्रपटांचा तो सुवर्णकाळ ओसरतोय. चित्रपटांची संख्या वाढल्याने व सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रेक्षकांचे आकर्षण कमी होत आहे. शिवाय जे थोडे फार प्रेक्षक आहेत त्यांचाही पसंतीक्रम बदलला आहे. त्यामुळेच हनीसिंगसारखे गायक ‘चार बोटल वोडका, काम मेरा रोजका’ ही आपली दिनचर्या गाण्यात मांडतात आणि लोक त्याला डोक्यावर घेतात. अशा या स्थितीत ‘चिठ्ठी आई हैं...’ सारखे गाणे कुणी ऐकणार तरी कसे, असा सवाल करीत त्यांनी आपल्याला आवडतील असे गाणे लिहून ते स्वत:च्या यु-ट्यूब चॅनलवर रिलीज करणार असल्याचे सांगितले.
गरीब विद्यार्थ्यांच्या शोसाठी मानधन नाकारले
शनिवारी माझा नागपुरात जो शो होतोय त्याचे आयोजक असलेल्या मैत्री परिवाराचे पदाधिकारी माझ्याकडे आले व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याकरिता हा शो करीत असून आपल्याला अपेक्षित रक्कम देऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते माझ्या अंत:करणाला भिडले व मी या शोसाठी मानधन न घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहितीही समीर यांनी दिली.