उपराजधानीत जुन्या कामठी रोडवर पालात राहणाऱ्या भटक्यांना नाही कसलाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:24 PM2020-05-17T20:24:37+5:302020-05-17T20:25:42+5:30
कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊन लागण्याला दोन महिने होत असताना कळमना वस्ती, जुना कामठी रोडवर मैदानात पाल टाकून वास्तव्यास असलेले भटके जमातीचे लोक व्याकुळ नजरेने मदतीची आस लावून बसले आहेत.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊन लागण्याला दोन महिने होत असताना कळमना वस्ती, जुना कामठी रोडवर मैदानात पाल टाकून वास्तव्यास असलेले भटके जमातीचे लोक व्याकुळ नजरेने मदतीची आस लावून बसले आहेत.
जळगाव, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधत नागपूरला आलेले बेलदार समाजाचे हे मजूर ३० पालात राहत आहेत. बालवाडी ते आठवीपर्यंतच्या ८० मुलांसह २२४ लोकांचे वास्तव्य आहे. पुरुष कोणत्याही कामावर जातात तर बायका मुले रस्त्यावर, चौकात मोबाईल कव्हर, हेडफोन, खेळणी विकण्याचे काम करतात. लॉकडाऊन लागले आणि यांच्या अडचणींचा प्रवास अधिक बिकट झाला. भूक सहन न झाल्याने काही दिवस भिकही मागून काढले. दरम्यान संघर्ष वाहिनीच्या कार्यकत्र्यांनी त्यांना अन्नधान्याच्या किट दिल्या. माँ फौंडेशन व गुरुद्वारा कमिटीने अन्न पुरविले. पण त्यांच्या मदतीला मर्यादा आहेत. त्यामुळे संघर्ष वाहिनीने मनपा व जिल्हा प्रशासनाला मदतीची विनंती केली.
कुणीही मजूर, गरीब उपाशी झोपू नये, त्यांची सोय करणे हे शासन, प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने २० दिवसानंतर जेवणाची व्यवस्था केली पण तेही एक वेळ आणि त्यातही प्रचंड अनियमितता. त्यामुळे या लोकांना कुचंबणा सहन करावी लागते आहे. प्रशासनाच्या दिरंगाई व दुर्लक्षामुळे या निराधारांच्या जगण्यात अनंत अडचणी आहेत. त्यांचे हाल पाहून स्वयंसेवी संस्थांना १५ मे रोजी पुन्हा धान्याची मदत करावी लागली. मात्र आमच्या मदतीला मर्यादा असून सरकारने त्यांची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन संस्थांतर्फे करण्यात येत आहे.
धान्य पुरविण्यातही अपयशी
मजुरांजवळ रेशन कार्ड नसले तरी त्यांना जगण्यासाठी धान्य पुरवठा करा असा न्यायालयाचा आदेश आहे. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी या भटक्यांच्या वस्तीतून ६० लोकांचे आधार कार्डही जमा केले. मात्र १७ मे लोटूनही धान्याचा दाणाही त्यांच्या पालात पोहचला नाही.