आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:00+5:302021-07-29T04:09:00+5:30
९११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती ...
९११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. परंतु या अतिवृष्टीला आठवडा लोटूनही नुकसानीचे सर्वेक्षण मात्र झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षण कधी होणार आणि नुकसाान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२१ व २२ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे २२ जुलैला जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाला. कामठी, सावनेर, कळमेश्वर, रामटेक व हिंगणा तालुक्यातील २१९ गाव बाधित झाले. पावसामुळे ९ हजार ११५.१२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर जवळपास ८ हजारावर शेतकरी बाधित झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सर्वाधिक ५ हजार हेक्टरमधील कापूस पिकांचे नुकसान झाले तर त्या खालोखाल तूर, सोयाबीन, धान, मका, संत्रा, मोसंबी व आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार अद्यापही जिल्ह्याच्या अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये कृषी व महसूल विभागातील कर्मचारी नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करीत आहेत. परिणामी प्रशासनाकडून अद्यापही त्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवालच तयार झाला नाही. त्यामुळे प्रशासन किती गांभीर्याने हे सर्वेक्षण करत आहे, हे दिसून येते.