१० हजार कि.मी च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:33 PM2017-12-15T22:33:08+5:302017-12-15T22:37:14+5:30
राज्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरवस्था झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री पाटील म्हणाले, हा रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर तयार करण्यात आला. त्याचा कालावधी समाप्त झाल्याने या मार्गावरील टोल बंद झाला. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम थांबले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या आधीच्या कंत्राटदारासोबत येत्या सोमवारी अथवा मंगळवारी बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. या रस्त्याने इतर मोठी वाहने वाढली आहेत. त्यामुळ येथे टोलनाका उभारून मोठ्या वाहनांकडून टोल वसुली करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोल बंद केला असून मोठ्या वाहनांकडून टोल वसुली केली जात आहे. राज्यात यापुढे मोठ्या वाहनांसाठी टोल लावण्यात येणार असून सर्वसामान्य वापरत असलेल्या किंवा त्यातून प्रवास करीत असलेल्या छोट्या वाहनांना टोल वसूल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खसडसेंनी विचारले ‘टोलमुक्त महाराष्ट्र’चे काय ?
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरुस्ती करून तेथे मोठ्या वाहनांवर टोल आकारण्याचा विचार असल्याचे सांगताच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उचलला. ते म्हणाले, सरकार आता पुन्हा बीओटीवर रस्ते बांधून टोल आकारण्याचे धोरण स्वीकारणार आहे का? आपण केलेली घोषणा ‘टोलमुक्त महाराष्ट्र’चे काय झाले, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी पाटील यांना अडचणीत आणले. ही संधी साधत अजित पवार यांनी यापुढे ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा अस्तित्वात राहणार नाही का, अशी विचारणा करीत सरकारवर नेम साधला.