रातुम नागपूर विद्यापीठात २४ वर्षांपासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 10:03 AM2018-04-04T10:03:32+5:302018-04-04T10:03:40+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची पुस्तके आहेत. परंतु या पुस्तकांची वार्षिक पडताळणीच करण्यात येत नाही.

There is no verification of books in the library for 24 years in Ratum Nagpur University | रातुम नागपूर विद्यापीठात २४ वर्षांपासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी नाही

रातुम नागपूर विद्यापीठात २४ वर्षांपासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी नाही

Next
ठळक मुद्दे‘कॅग’च्या अहवालात विद्यापीठ ग्रंथालयांची लक्तरेदुर्मिळ हस्तलिखिते धोक्यात असल्याचे ताशेरे

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची पुस्तके आहेत. परंतु या पुस्तकांची वार्षिक पडताळणीच करण्यात येत नाही. गेल्या २४ वर्षांपासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणीच झालेली नाही. प्रशासकीय अनास्थेमुळे ग्रंथालयातील दुर्मिळ हस्तलिखितेदेखील धोक्यात आली असल्याचे ताशेरे ‘कॅग’तर्फे (कॉम्प्ट्रोलर अ‍ॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) ओढण्यात आले आहेत.
‘कॅग’तर्फे ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल जारी करण्यात आला व तो राज्य विधिमंडळात सादर करण्यात आला. ‘कॅग’ने २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीची तपासणी करण्यासाठी जानेवारी ते जून २०१७ दरम्यान लेखापरीक्षण केले होते. ‘कॅग’च्या चमूने केलेल्या पाहणीत नागपूर विद्यापीठातील ग्रंथालयांची स्थिती फारशी चांगली नसल्याचे दिसून आले. नागपूर विद्यापीठात पी.व्ही.नरसिंहराव ग्रंथालय आणि महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील ग्रंथालय ही मुख्य ग्रंथालये आहेत. सोबतच स्नातकोत्तर शिक्षण विभागातील ग्रंथालये व तीन संचालित महाविद्यालयांमधील ग्रंथालयांचादेखील समावेश होतो. विद्यापीठाकडे एकूण ३ लाख ८५ हजार ८९० पुस्तकांचा संग्रह आहे. यात १६ हजार ९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तके आहेत. ३६ हजार २५९ नियतकालिकांचे सीमित ग्रंथ असून, १४ हजार ३१२ हस्तलिखिते कॅम्पसमधील ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. ‘कॅग’च्या लेखापरीक्षणात १९९४ पासून विद्यापीठाने पुस्तकांची प्रत्यक्ष पडताळणीच केली नसून वस्तुसूची नोंदवहीवर याबाबतचे प्रमाणपत्र नोंदविलेले नाही, अशी बाब समोर आली.
कर्मचाऱ्यांची कमतरता व पुस्तकांची जास्त संख्या यामुळे प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली नाही, असे उत्तर तत्कालीन ग्रंथपालांनी ‘कॅग’च्या चमूला दिले.

‘डिजिटलायझेशन’च्या पैशातून पुस्तकांची खरेदी
हस्तलिखितांचे ‘डिजिटलायझेशन’ आवश्यक असून निधी मिळाल्यानंतर हे कार्य करण्यात येईल, असे उत्तर विद्यापीठाकडून ‘कॅग’च्या चमूला देण्यात आले. प्रत्यक्षात मार्च २०१६ मध्ये विद्यापीठाला ‘रुसा’अंतर्गत पुस्तके, जर्नल्स आणि प्रबंधांच्या ‘डिजिटलायझेशन’साठी ९९ लाख ७० हजार प्रदान करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष ‘डिजिटलायझेशन’साठी हा निधी न वापरता यातील ७६ लाख ४० हजार रुपयांची तर विद्यापीठाने पुस्तकेच विकत घेतली.

काय म्हणतात नियम?
नियमानुसार विद्यापीठातील सर्व ग्रंथालयांच्या पुस्तकांची वार्षिक प्रत्यक्ष पडताळणी व्हायला हवी. जर पुस्तकांची संख्या, किंमत आणि वेळ यामुळे हे शक्य नसेल तर पाच वर्षांच्या कालावधीत ही पडताळणी व्हायला हवी.
एखाद्या स्वतंत्र अधिकाऱ्याकडून ही पडताळणी अनपेक्षित नमुना तपासणी म्हणून व्हायला हवी. याची नोंदसूची, वस्तुसूची किंवा संग्रह नोंदवहीत होणे अपेक्षित आहे, असे ‘कॅग’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

फरशीवर पडली होती पुस्तके
‘कॅग’च्या चमूने ज्ञान केंद्राच्या संचालकांसह संयुक्त पाहणी केली. यात मुख्य ग्रंथालयात जुनी पुस्तके वाईट परिस्थितीत दिसून आली. मुख्य ग्रंथालयातील फरशीवर पुस्तके पडली होती तर अनेक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ‘रॅक्स’मध्ये ठेवले होते. ग्रंथालयातील खिडक्यांची काचे तुटली होती व पुस्तके थेट सूर्यकिरणांच्या संपर्कात येत होती. त्यामुळे पुस्तकांच्या स्थितीत ऱ्हास होत होती. पुस्तके, पुस्तकांच्या कपाटावर धुळीचा थर साचला होता.

दुर्मिळ पुस्तकांच्या सुरक्षेबाबत काळजी नाही
ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात दुर्मिळ पुस्तके व हस्तलिखिते आहेत. परंतु ग्रंथालयातील अग्निशमन यंत्रे भरलेली नव्हती. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत दुर्मिळ पुस्तके व हस्तलिखिते यांच्यासह सर्व पुस्तकांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘कॅम्पस’ ग्रंथालयात तर १७१७ हून अगोदरची दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. मात्र ती वाईट परिस्थितीत ठेवल्याचे ‘कॅग’च्या चमूला आढळून आले. जर या मूल्यवान हस्तलिखितांचे योग्य परिरक्षण किंवा संवर्धन करण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर ते भविष्यात वापरासाठी उपलब्ध राहणार नाहीत, अशी भीती ‘कॅग’च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: There is no verification of books in the library for 24 years in Ratum Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.