तूर्त नागपूर शहरात पाणीकपात नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:33 PM2019-06-10T21:33:50+5:302019-06-10T21:38:25+5:30
दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी व भाजपा नेत्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. डेड स्टॉक संपला तर दिवसाआड तर दूरच शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याचा गंभीर धोका आहे. याचा विचार करता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय वा पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. २० जूनपर्यंत पाणीपुरवठा यथावत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणीटंचाईसंदर्भात सर्वच चितिंत आहेत. शहरात २००६ नंतर प्रथमच कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी व भाजपा नेत्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. डेड स्टॉक संपला तर दिवसाआड तर दूरच शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याचा गंभीर धोका आहे. याचा विचार करता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय वा पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. २० जूनपर्यंत पाणीपुरवठा यथावत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणीटंचाईसंदर्भात सर्वच चितिंत आहेत. शहरात २००६ नंतर प्रथमच कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.
शहराच्या पाणीपुरवठ्यात सध्याच कपात केली जाणार नाही. मात्र कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे. मान्सूनच्या आगमनावर सर्वकाही निर्भर राहणार असल्याचे बैठकीला उपस्थित जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. पुढील काही दिवसात पाऊ स झाला तर कच्च्या पाण्याची समस्या सुटेल. तोतलाडोहातील आरक्षित डेड स्टॉकमधून जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो.
जलवाहिनीसाठी सरकार ८० कोटी देणार
नवेगाव खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा ते कन्हान नदीतील इन्टेक वेल अशी ४४.७ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी १७ कि.मी.पर्यंत सर्वे करण्यात आला. सध्या कालव्याव्दारे पाणी आणले जाते. जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी आणल्यास ४० एमएलडी पाण्याची बचत होईल. यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती झलके यांनी दिली. सर्वे तातडीने पूर्ण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. प्रस्तावानुसार यासाठी राज्य सरकारकडून ८० कोटी मिळणार आहे.
कन्हान येथे एक्सप्रेस फीडर
कन्हान जलशुद्धिकरण केंद्राच्या ठिकाणी एक्स्प्रेस फीडर नसल्याने वीज पुरवठा वारंवार बाधित होतो. एक्स्प्रेस फीडरसाठी तीन कोटींचा खर्च असल्याची माहिती महावितरणने दिली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने १.३० कोटीत एक्स्प्रेस फीडर उभारण्याची तयारी महावितरणने दर्शविली आहे. मंगळवारी ही रक्कम महापालिका महावितरणच्या खात्यात जमा करणार आहे.