वीज नाही तर पाणीही नाही
By admin | Published: June 19, 2017 02:13 AM2017-06-19T02:13:30+5:302017-06-19T02:13:30+5:30
नवेगाव- खैरी, कन्हान व जुना गोरेवाडा यासह पाच जलशुद्धीकरण केंद्रांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने
नागरिक त्रस्त : ४५ दिवसात १६ वेळा वीज पुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवेगाव- खैरी, कन्हान व जुना गोरेवाडा यासह पाच जलशुद्धीकरण केंद्रांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागपूर शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या ४५ दिवसात जलशुद्धीकरण केंद्रांचा १६ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे ४१.२५ तास पंपिंग बंग राहिले. वीज पुरवठा खंडित झाल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा वीज पूर्ववत आल्यानंतरही सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच यामुळे पंपिंगचे नुकसान होते. २४० एमएलडी क्षमतेच्या कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचा ४९ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे १८.१५ तास पंपिंग बाधित होते. १३६ एमएलडी क्षमतेच्या पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्राचा ११ वेळा , १४५ एमएलडी क्षमतेच्या पेंच-२ केंद्रात ५ वेळा, १२० एमएलडी क्षमतेच्या पेंच-३ केंद्रात ८ वेळा तर १६ एमएलडी क्षमतेच्या गोरेवाडा केंद्रात १४ वेळा वीज पुरवठा बांधित झाला.
नवेगाव- खैरी पंपिंग स्टेशन आणि गोरेवाडा केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराच्या पश्चिम, मध्य, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूरच्या काही भागाचा पाणी पुरवठा बाधित झाला होता. कन्हान केंद्रात वीज पुरवठा बाधित झाल्यास पूर्ण,उत्तर आणि दक्षिणच्या काही भागाचा पाणीपुरवठा बाधित राहिला.
वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने जलवाहिनीत हवा शिरते. ती बाहेर काढण्यासाठी बराच कालावधी लागतो. तसेच जलवाहिनीत दूषित पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो.
जलशुद्धीकरण केंद्रांचा थोडावेळ वीज पुरवठा खंडित झाला तरी यामुळे जलकुंभांची पाण्याची पातळी कमी होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. पाच मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला तरी पंपिंग सुरू होऊ न जलवाहिनीत अपेक्षित जलप्रवाह येण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. दुसरीकडे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने टँकरची मागणी वाढते. नागरिकांनी अशा प्रसंगी सहकार्य करावे, असे आवाहन आॅरेज सिटी वॉटर यांनी केले आहे.