१५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा एकही नवीन खंड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 08:00 AM2021-09-19T08:00:00+5:302021-09-19T08:00:02+5:30
Nagpur News शासनाने १५ मार्च १९७५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीची गेल्या ४४ वर्षांत केवळ २२ खंड व ३ सोअर्स मेटरियल एवढीच कामगिरी राहिली. २००६ पासून तर एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही.
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून, या साहित्याला महाराष्ट्रासह देशात व परदेशातही मोठी मागणी आहे. हे विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीची गेल्या ४४ वर्षांत केवळ २२ खंड व ३ सोअर्स मेटरियल एवढीच कामगिरी राहिली. २००६ पासून तर एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून प्रकाशनाचे कार्य ठप्प पडलेले आहे. (There is not a single new volume of Babasaheb Ambedkar's literature for 15 years)
बाबासाहेबांच्या साहित्याला (खंडांना) प्रचंड विक्रीमूल्य असतानादेखील राज्य शासन व प्रकाशन समिती या खंडाच्या पुनर्मुद्रण आणि प्रकाशित मराठी खंडाचा इंग्रजी अनुवाद व इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. प्रकाशित अनेक खंडांचे पुनर्मुद्रण कार्य, गेल्या १६ वर्षांपासून खंडाच्या मराठी अनुवादाची मुद्रित प्रकाशन समितीकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. इतकेच नव्हे तर आजवर प्रकाशित झालेल्या एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित झालेला नाही.
शासनाने अलीकडेच प्रकाशन साहित्य समिती गठित केली. नागपूरचे डॉ. प्रदीप आगलावे यांच्याकडे सदस्य सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश आहे. त्यामुळे १५ वर्षातील अनुशेष ही समिती भरून काढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी नवीन खंड लोकांच्या हाती यावा
बाबासाहेबांचा अतिशय महत्त्वाचा असलेला प्रॉब्लेम ऑफ रुपी या इंग्रजी खंडाचे मराठी अनुवादित ग्रंथ ऑगस्टमध्ये प्रकाशित करावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. प्रकाशन समिती व सरकारकडून याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला. परंतु ते शक्य झाले नाही. आता किमान येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी हा ग्रंथ प्रकाशित होऊन लोकांच्या हाती यावा, अशी अपेक्षा आहे.
प्रकाश बंसोड, अध्यक्ष भारतीय दलित पँथर