श्री साई शिक्षण संस्थेच्या कारभारामध्ये काहीही गैर आढळलेले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:16+5:302021-08-14T04:11:16+5:30
नागपूर : श्री साई शिक्षण संस्था, नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) सर्व खात्यांमधील जमाखर्चाचे लेखापरीक्षण करण्यात आले ...
नागपूर : श्री साई शिक्षण संस्था, नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) सर्व खात्यांमधील जमाखर्चाचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. तसेच सर्व जमाखर्च आयकर अधिकारी आणि धर्मादाय आयुक्तांकडूनही वेळोवेळी तपासले गेलेले आहेत. कोणत्याही शासकीय यंत्रणेला अथवा अधिकाऱ्यांना संस्थेच्या कोणत्याही कारभारामध्ये काहीही गैर आढळलेले नाही, असा दावा श्री साई शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आला आहे.
संस्थेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तसेच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून श्री साई शिक्षण संस्था ही धर्मादाय शिक्षण संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने अतिशय दर्जेदार तांत्रिक शिक्षण आणि सुविधा पुरवल्या जातात. उद्योग क्षेत्राला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ, नवनवीन उद्योजक आणि टेक्नोक्रॅट पुरवण्यासाठी तसेच भविष्यातील ध्येयपूर्ती करण्यासाठी संस्था कार्यरत आहे. अलीकडे काही प्रसारमाध्यमांमध्ये साई शिक्षण संस्था, एनआयटी यांच्या विषयी प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तामुळे संस्थेची प्रतिमा आणि समाजातील स्थान यावर विपरीत परिणाम होत आहे. वास्तविक संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक आहे, असाही दावा संस्थेने केला आहे.