वैभव जपायचे तर योग्य भाडे हवेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:48 AM2017-10-26T01:48:18+5:302017-10-26T01:48:30+5:30
अत्याधुनिक सुरेश भट सभागृहामुळे नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या प्रकल्पावर ७८ कोटींंचा खर्च झाला आहे. वैभव कायम ठेवण्यासाठी सभागृहाची व्यवस्थित देखभाल करावी लागले.
लोकमत न्यूज नेटवकं
नागपूर : अत्याधुनिक सुरेश भट सभागृहामुळे नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या प्रकल्पावर ७८ कोटींंचा खर्च झाला आहे. वैभव कायम ठेवण्यासाठी सभागृहाची व्यवस्थित देखभाल करावी लागले. पाच हजारांच्या भाड्यातून ते शक्य होणार नाही. तसेच अत्यल्प भाडे आकारले तर उद्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाची गर्दी होऊन सभागृहाला समाजभवनाचे स्वरूप येईल. हौशी व कलापे्रमी संस्थांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यांना माफक दरात सभागृह उपलब्ध करण्याला विरोध नाही. पण व्यावसायिक संस्थांना बाजारभावाप्रमाणे भाडे आकारावे लागेल तरच सभागृहाची देखभाल करता येईल.
दोन हजार आसनक्षमता असलेल्या सभागृहामुळे कलावंतांना व्यासपीठ निर्माण झाले आहे. केद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शैक्षणिक संस्थाना पाच हजारात सभागृह उपलब्ध व्हावे, अशी भावना व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. सर्वच संस्थांना पाच हजारात सभागृह उपलब्ध होणार असल्याचा प्रचार सुरू आहे. किमान ना नफा ना तोटा या तत्त्वावर सभागृहाचे भाडे आकारणी होण्याची गरज आहे. देखभाल व दुरुस्तीचा खर्च निघाला तरच सभागृह व्यवस्थित चालू शकेल. यासाठी व्यावसायिक ,राजकीय तसेच अन्य संस्थाकडून भाडे वसुली करण्याबाबत सादर करण्यात आलेला प्रस्ताव योग्यच आहे. शुक्र वारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी तो ठेवला जाणार आहे.
सभागृहाचे भाडे आकारण्यासाठी वेगवेगळे मापदंड तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या संस्थानिहाय कार्यक्रमासाठी भाड्याचे टप्पे ठरविले जाणार आहे. महापालिकेला सभागृह चालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांनी मुंबईतील षण्मुखानंद व इतर दोन, दिल्लीतील सिरीफोर्ट, पुण्यातील सभागृह अशा एकूणआठ सभागृहाच्या कामकाजाचा अभ्यास करून भाड्याचे टप्पे तयार केले आहे.
सभागृहाच्या आरक्षणासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रारुप नियमावली व प्रस्तावित भाडे निश्चित केले आहे. या स्थायी समितीच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
अव्यावसायिक व व्यावसायिक संस्थांसाठी सभागृहाचे भाडे वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. यात प्रायोगिक नाटक, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आदी संस्थांसाठी १२,९८० ते ३६,५८० इतके भाडे ठेवण्यात आले आहे. बाल्कनीसह सभागृह सभागृहाचे भाडे अधिक आहे. बाल्कनी शिवाय सभागृह वापरावयाचे असल्यास भाडे कमी आकारण्यात येणार आहे. तसेच सकाळी ८.३० ते ११.३० या सत्रासाठी भाडे १२९८० ते २४७८० आकारण्यात येणार आहे. दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेसाठी १७७५० ते २९५०० तर सायंकाळ व रात्रीच्या सत्रासाठी सर्वाधिक भाडे ठेवण्यात आले आहे. यात २४,७८० ते ३६,५८० इतके भाडे आकारण्यात येणार आहे.
व्यावसायिक नाटक, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, जादूचे प्रयोग, आर्केस्ट्रा व फॅ शन शो आदीसाठी १७,७०० ते ५३,१०० इतके भाडे आकारण्यात येणार आहे. सकाळच्या कार्यक्रमासाठी भाड्याचे दर कमी असून सायंकाळी व रात्रीसाठी दर अधिक ठेवण्यात आले आहे.
सभासंमेलन, परिषद, परिचर्चा (शासन उपक्रम वगळून ) अशा कार्यक्र मासाठी सर्वाधिक दर ठेवण्यात आले आहे. यात २४,७८० ते ६०,१८० भाडे द्यावे लागणार आहे. सभागृहाचा वापर बाल्कनीसह करावयाचा असल्यास भाड्याचे दर अधिक आहे.
तसेच बाल्कनी शिवाय कमी आसनक्षमते करिता भाडे कमी आकारण्यात येणार आहे. बालनाटक व हौशाी नाटक यासाठी सर्वात कमी दर आकारण्यात येणार आहे. अशा कार्यक्रमासाठी सकाळी व दुपारी अशा दोनच सत्रात सभागृह उपलब्ध होणार आहे. यासाठी १२,९८० ते २४,७८० इतके भाडे द्यावे लागणार आहे.
सभागृहासाठी नियमावली
सभागृह भाड्याने देताना यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यात सभागृहाचा वापर नाटक, संगीत, नृत्य, संमेलन सांस्कृतिक व आध्यात्मिक व्याख्याने, व्यावसायिक चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या दराने सभागृह उपलब्ध करण्यात येईल. सभागृहाचे आरक्षण आॅनलाईन करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमाच्या आधी ३० दिवस आॅनलाईन अर्ज करावा लागेल. कमीत कमी पाच दिवस आधी अर्ज करता येईल. अर्ज विहीत नमुन्यातच करावा लागणार आहे. आरक्षणाचे भाड्यासह ५० हजार रुपये अनामत रक्कम आकारण्यात येईल. सभागृहाचे कोणतेही नुकसान न झाल्यास ही रक्कम परत करण्यात येईल. सभागृहाचे आरक्षण सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री अशा कालावधीसाठी उपलब्ध राहील. कालावधीनुसार भाडे आकारण्यात येईल. सभागृह भाड्याने देण्यासाठी नियमावली तयार केली आहे.