सुधारित डिस्चार्ज धोरणाचा धोका तर नाही? ताप नसल्यास दहाव्या दिवशी सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:49 AM2020-05-16T09:49:34+5:302020-05-16T09:49:55+5:30

मेडिकलने गुरुवारी २१ तर मेयोने शुक्रवारी ५१ अशा एकूण ७२ रुग्णांना सुटी दिली. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांची घरे छोटी आहेत.यामुळे ‘क्वारंटाईन’ राहणे शक्य आहे का, यांच्यापासून इतरांना लागण तर होणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Is there a risk of a revised discharge policy? | सुधारित डिस्चार्ज धोरणाचा धोका तर नाही? ताप नसल्यास दहाव्या दिवशी सुटी

सुधारित डिस्चार्ज धोरणाचा धोका तर नाही? ताप नसल्यास दहाव्या दिवशी सुटी

Next
ठळक मुद्देदोन दिवसात ७२ कोरोनाबाधित घरी

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार मेडिकलने गुरुवारी २१ तर मेयोने शुक्रवारी ५१ अशा एकूण ७२ रुग्णांना सुटी दिली. यांच्याकडून पुढील सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले आहे. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांची घरे छोटी आहेत. यातच एकाच घरात पाचपेक्षा जास्त जण राहणारे आहेत. यामुळे ‘क्वारंटाईन’ राहणे शक्य आहे का, यांच्यापासून इतरांना लागण तर होणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्यामध्ये याच सुधारित धोरणानुसार आज शुक्रवारी २४ रुग्णांना सुटी देण्यात आली. परंतु यातील २१ रुग्णांनी होम आयसोलेशनची सोय नसल्याचे प्रशासनाला सांगितले. यामुळे त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. हाच एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे.

‘कोविड-१९’ सुधारित डिस्चार्ज’ धोरणानुसार कोविडच्या ज्या रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यापासून सातव्या, आठव्या व नवव्या दिवसांच्या कालवधीत ताप आलेला नाही, त्या रुग्णाला दहाव्या दिवशी तपासणी करून डिस्चार्ज देण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालयातून सुटी देताना कोविड विषाणूसाठी प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता नसल्याचेही म्हटले आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना पुढील सात दिवसांसाठी घरी विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या व त्यांच्या हातावर तसा स्टॅम्प लावण्याच्या सूचनाही आहेत. डिस्चार्ज करण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी आढळून आल्यास रुग्णांना ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ला पाठविण्यास म्हटले आहे. या शिवाय मध्यम लक्षणे असलेले रुग्ण जे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’मध्ये दाखल आहेत त्या रुग्णांची शरीराच्या तापमानाची व आॅक्सिजन सॅच्युरेशनची तपासणी करण्याच्याही सूचना आहेत. ज्या रुग्णांमध्ये तीन दिवसांमध्ये ताप कमी झाला आहे, आणि पुढील चार दिवस त्यांचे रुम एअरवर आॅक्सिजन सॅच्युरेशचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशा रुग्णांना लक्षणे सुरू झाल्यापासून १० दिवस पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मेयो, मेडिकलने दोन दिवसांत ७२ रुग्णांना सुटी दिली. यातील बहुसंख्य रुग्ण हे मोमिनपुरा, सतरंजीपुरा, शांतिनगर येथील वसाहतीतील आहेत. येथील अनेकांची घरे छोटी, काहींची घरे एकाच खोलीची आहेत. काहींच्या घरात पाचपेक्षा जास्त सदस्य आहेत. एकच बाथरूम व शौचालय आहे. अशावेळी होम क्वारंटाईनचे नियम पाळणे शक्य आहे का, यांच्यापासून घरातील इतर सदस्यांना लागण झाल्यास जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

-‘होम क्वारंटाईन’ म्हणजे काय?

होम क्वारंटाईन म्हणजे, घरामध्ये इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवणे. एका वेगळ्या खोलीत सर्वांपासून अलग राहणे. यासाठी घरात हवा खेळती राहील अशी खोली हवी, यात टॉयलेटही असावे. त्याच खोलीत आणखी कुणी असेल तर त्यांच्यामध्ये १ मीटर इतके अंतर असावे. साबणाने वारंवार हात धुवावे, अल्कोहोल असलेल्या चांगल्या हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा. घरामध्ये पाणी, भांडी, टॉवेल आणि इतर गोष्टींना स्पर्श करू नये. सर्जिकल मास्क लावून राहायला हवे. दर ६ ते ८ तासांनी मास्क बदलणे गरजेचे आहे. त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावायला हवी. या व्यतिरिक्त टॉयलेट रोज रेग्युलर हाऊसहोल्ड ब्लिचने स्वच्छ करायला हवे. ज्यांना रुग्णालयातून सुटी झाली त्यातील किती जणांना हे शक्य आहे, याचे सर्वेक्षण होणेही गरजेचे आहे.

 

Web Title: Is there a risk of a revised discharge policy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.