नियतकालिकांच्या कागद, छपाई, वितरणावर नाममात्र कर असावा
By निशांत वानखेडे | Updated: December 28, 2024 19:18 IST2024-12-28T19:18:13+5:302024-12-28T19:18:58+5:30
ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके : साहित्य अकादेमी आणि वि. सा. संघाचा परिसंवाद

There should be a nominal tax on the paper, printing, and distribution of magazines.
नागपूर : नियतकालिके ही अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असून सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु नियतकालिके अधिक व्यापक होण्यासाठी आणि अधिकाधिक वाचकांपर्यंत नियमितपणे पोचण्यासाठी त्यांच्या कागद, छपाई, वितरणावर नाममात्र कर असावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.
साहित्य अकादेमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. वि. सा. संघाच्या अमेय दालनात आयाेजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य अकादेमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रमोद मुनघाटे, क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर व युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार उपस्थित होते.
डहाके पुढे म्हणाले की सरकारी अनुदान हे बरेचदा तुटपुंजे असते, त्यातून वास्तविक खर्च निघत नाही. त्यामुळे दानकर्ता, प्रायोजक आणि प्रेक्षकांवर आर्थिक नियोजनाचा भार पडतो. याशिवाय सरकारी अनुदानात सरकारचा हस्तक्षेप नसावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. जवळ जवळ १८०० च्या काळापासून निघालेल्या नियतकालिकांचा आढावा घेत साहित्य संघाच्या युगवाणीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ऑनलाईन नियतकालिके, पारंपरिक ते ऑनलाईन रूपांतर, त्याचा वाचक वर्ग आणि त्याची शाश्वतता यावर देखील त्यांनी चर्चा केली. रूपरेखा ओमप्रकाश नागर, तर प्रास्ताविक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले.
मास्तरांना गुंतविले, ग्रंथालय संपले, वाचक कसे हाेतील : गवस
परिसंवादाच्या समाराेपीय सत्रात प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी सरकारच्या धाेरणावर प्रश्न उपस्थित केले. मास्तरांना वेगवेगळ्या कामात गुंतविले, शाळेतील ग्रंथालये संपली आहेत, अशावेळी विद्यार्थी दशेतून वाचक कसे तयार हाेतील, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना गवस म्हणाले, काेणत्याही विचारधारेच्या लाेकांनी एकमेकांचे पटत नसले तरी एका मंचावर वैचारिक चर्चा घडवावी. वैचारिक अस्पृश्यता अतिशय अयोग्य आहे. संवादाने विचार विकसित होतात म्हणून वाद-प्रतिवादाला नियतकालिकांत जागा हवी. आज ती नसल्याने लवकर भावना दुखावण्याचा काळ आला व निखळ निकोपता लयाला गेली, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
दोन अभ्यासपूर्ण सत्रे
परिसंवादाच्या निमित्ताने ‘साहित्यिक नियतकालिके’ व ‘वैचारिक नियतकालिके’ अशा दोन अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमाेद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेत साहित्यिक नियतकालिके हे सत्र झाले. यात गणेश सातपुते यांनी देशातील नियतकालिकांचा इतिहास उलगडला. आसाराम लोमटे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना वाचन संस्कृती व गंभीर वाचक नाहीत, ही टीका अयाेग्य असल्याचे म्हटले. नवीन पिढीमध्ये जाणून घेण्याची जिज्ञासा आहे पण ती त्यांच्या मार्गाने पाेहचवावी लागेल, अशी भावना व्यक्त केली. राजेंद्र डाेळके यांच्या अध्यक्षतेत वैचारिक नियतकालिके हे सत्र झाले. यात सहभागी झालेल्या अरुणा सबाने यांनी सामाजिक चेतना व नियतमालिके आणि रुविंद्र रुक्मणी पंढरीनाथ यांनी ‘राजकीय जाणीवा आणि नियतकालिके’ या विषयावर विचार व्यक्त केले.