आदिवासी क्षेत्रात वनाधारित रोजगार निर्मितीवर भर देणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:15 AM2018-03-24T00:15:50+5:302018-03-24T00:16:02+5:30
आदिवासी क्षेत्रात वनांवर आधारित रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच वनउपजांवार प्रक्रिया उद्योग निर्माण करून त्यांना संघटित विपणनाद्वारे योग्य बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी क्षेत्रात वनांवर आधारित रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच वनउपजांवार प्रक्रिया उद्योग निर्माण करून त्यांना संघटित विपणनाद्वारे योग्य बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व्यक्त केले.
विदर्भ विकास मंडळाची सन २०१७-१८ या वित्तीय वर्षातील पाचवी बैठक शुक्रवारी दीक्षाभूमीजवळील विदर्भ विकास मंडळाच्या कार्यालयाच्या सभाकक्षात पार पडली. विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार हे अध्यक्षपदी होते. बैठकीत विदर्भ इकॉनॉमिक्स कौन्सिल(वेद) या संस्थेचे देवेंद्र पारेख, उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी, माजी तज्ज्ञ सदस्य तथा उपसमितीचे अध्यक्ष देवाजी तोफा, सदस्य डॉ. कुंदन दुपारे, सतीश गोगुलवार तसेच विदर्भ विकास मंडळाचे तज्ञ सदस्य डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. कपिल चांद्र्रायण, अपर आयुक्त तथा सदस्य सचिव निरुपमा डांगे, सह संचालक अरविंद देशमुख, नियोजन उपायुक्त बी. एस. घाटे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा जिल्हा विकास अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. गोंदिया जिल्हा विकास अहवाल तयार करण्याकरिता विदर्भातील काही संस्थांमार्फत करावयाचे प्रस्तावित आहे. यावेळी यवतमाळ जिल्हा आराखड्याला मंजुरी देण्यात आली. आदिवासी क्षेत्रात वन आधारित रोजगार निर्मिती, वन उपजावर प्रक्रिया उद्योग निर्मितीबाबत जाणीव आणि जागृती या अहवालाबाबत उपसमितीचे अध्यक्ष देवाजी तोफा तसेच सदस्य सतीश गोगुलवार यांनी सादरीकरण केले. या अहवालाला सर्वांच्या सहमतीने मान्यता देण्यात आली.
देवेंद्र पारेख, प्रदीप माहेश्वरी यांनी रोजगार, पर्यटन, हॉटेलिंग क्षेत्र, आरोग्य सुविधा, क्रीडा क्षेत्र तसेच मनोरंजनासाठी करू शकणाऱ्या नियोजनाबाबत सादरीकरण केले.
मोहाच्या फुलांपासून रोजगार निर्मिती
यावेळी अध्यक्ष देवाजी तोफा यांनी मोहाच्या फुलांपासून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. मोहाच्या फुलांपासून बनविण्यात येणारे सरबत आणि लाडू यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मोहाच्या फुलापासून बनविण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांसाठी लागणाऱ्या यंत्रणेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.