गुंडांच्या मनात वर्दीची भीती असलीच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:18 AM2018-08-14T01:18:11+5:302018-08-14T01:24:31+5:30
गुन्हेगार लहान असो की मोठा, त्याच्या मनात वर्दीची (पोलिसांची) भीती असलीच पाहिजे. दुसरीकडे पोलीस हा आपला मित्र आहे, सहकारी आहे, असा सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे. भीती आणि विश्वासाचे समीकरण जुळवून नागपूरकरांना भयमुक्त सेवा देण्यावर आपण भर देणार आहो, असे मनोगत गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगार लहान असो की मोठा, त्याच्या मनात वर्दीची (पोलिसांची) भीती असलीच पाहिजे. दुसरीकडे पोलीस हा आपला मित्र आहे, सहकारी आहे, असा सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे. भीती आणि विश्वासाचे समीकरण जुळवून नागपूरकरांना भयमुक्त सेवा देण्यावर आपण भर देणार आहो, असे मनोगत गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
गायकर चार दिवसांपूर्वी पुण्याहून नागपुरात बदलून आले. यापूर्वी त्यांनी नागपूर शहरात प्रत्यक्ष सेवा दिलेली नाही. मात्र, विदर्भातील भंडारा तसेच मराठवाड्यातील लातूर, कोकणातील रायगड, ठाणे तसेच पोलीस प्रशिक्षण विभाग आणि सीआयडीत काम केलेले आहे. येथे रुजू होताच त्यांनी दैनंदिन कामकाज सांभाळताना पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्या भागातील गुन्हेगारी तसेच पोलिसांचे संख्याबळ समजून घेणे सुरू केले आहे. सोमवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तडीपार केलेले गुंड परत नागपुरात येतात, राहतात अन् गुन्हेगारीही करतात. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गुन्हेगारांना मोकाट वावरण्याची संधी मिळाल्यास ते उपद्रव करतील. सर्वसामान्यांना त्याचा त्रास वाढेल. नागरिकांना हा त्रासच होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगारांना त्यांची जेथे (कारागृहात) जागा आहे, तेथेच पाठवण्यावर आपण भर देणार आहो. तडीपार गुंडांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांना खास सूचना देण्यात येतील. संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीएसारखी कारवाई झाली की ते कारागृहात पोहचतात. त्यामुळे आपोआपच गुन्हेगारी नियंत्रित होते. रस्त्यावर पोलीस दिसला की गुन्हेगार चरकतो. तो दुरूनच पळ काढतो. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित करता येते आणि रस्त्यावर उतरल्याने पोलिसही नियमित नागरिकांच्या संपर्कात राहतो. नागरिकांशी त्याची जवळीकता वाढते. विश्वास जिंकता येतो. त्यासाठी वाहनातून गस्त घालण्यासोबतच ‘फूट पोलीस पेट्रोलिंग’वर भर देणार आहोत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे नागपूरला गुन्हेगारमुक्त शहर बनवायचे प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करणार असल्याचे गायकर म्हणाले.
विस्कळीत वाहतूक रस्त्यावर!
उपराजधानीचा झपाट्याने विस्तार होत आहे. बाहेरचे गुन्हेगार येऊन येथे चोºया, घरफोडी, सोनसाखळी चोरीसारखे गुन्हे करीत आहेत. त्यावर अंकुश बसविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. शहराला गुन्हेगारमुक्त बनविण्यासोबतच अपघातमुक्त करण्याची पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची संकल्पना आहे. त्यासाठी आपण वाहतूक पोलिसांची सध्याची कार्यपद्धती समजून घेणार आहोत. अपघातामागची कारणे जाणून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू. नागपुरात रस्ते प्रशस्त आहेत, मात्र वाहतुकीची वारंवार कोंडी होते. त्यामागची कारणे शोधून लवकरच विस्कळीत वाहतूक रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न करू, असेही मत अतिरिक्त आयुक्त गायकर यांनी व्यक्त केले.