वर्षभरात सव्वा सहाशे ऑनलाइन पीएचडी व्हायवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:51+5:302021-07-02T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कोरोनाचा विविध पद्धतीने फटका बसला असला तरी या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कोरोनाचा विविध पद्धतीने फटका बसला असला तरी या संकटातून सकारात्मक बाबीदेखील समोर आल्या. पीएचडी व्हायवासाठी उमेदवारांच्या पिळवणुकीवर नियंत्रण आले असून वर्षभरात सव्वासहाशे ऑनलाइन वायव्हा झाले. १०८व्या दीक्षांत समारंभादरम्यान ८७० उमेदवारांना पीएचडी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठात शोधप्रबंध सादर केल्यानंतर पीएचडी व्हायवा होईपर्यंत उमेदवारांच्या मनात धाकधूकच असायची. व्हायवाच्या वेळी येणाऱ्या परीक्षकांची विशेष व्यवस्था करण्यात बराच खर्चदेखील व्हायचा. पदवीचा प्रश्न असल्याने फारसे कुणी तक्रार करण्यास धजावत नव्हते. परंतु कोरोनामुळे प्रत्यक्ष व्हायवा बंद झाले. पीएचडीची प्रक्रियाच ठप्प पडते की काय, असा प्रश्न निर्माण झाला असताना विद्यापीठाने ऑनलाइन व्हायवा घेण्याचा प्रस्ताव मांडला. यासंदर्भात विशेष समिती नेमण्यात आली व समितीच्या अहवालाच्या आधारावर ऑनलाइन व्हायवांना सुरुवात करण्यात आली. जून २०२० मध्ये विद्यापीठात ही नवीन सुरुवात झाली. विविध ॲपच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू झाली. परीक्षकांना त्यांच्या घरी बसूनच व्हायवा घेणे शक्य झाले व त्याचा अहवालदेखील ऑनलाइन माध्यमातूनच पाठविण्याची सुविधा देण्यात आली. वर्षभरात ६२५हून अधिक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन व्हायवा यशस्वी पद्धतीने झाले आहेत. या प्रणालीमुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून आर्थिक देवाणघेवाणदेखील नियंत्रणात आली आहे. ९ जुलै रोजी आयोजित दीक्षांत समारंभादरम्यान ८७०हून अधिक उमेदवारांना पीएचडी प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यातील इतर विद्यापीठाच्या तुलनेत, नागपूर विद्यापीठाने ऑनलाइन व्हायवामध्ये चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन तसेच निर्बंध असूनदेखील पीएचडीची प्रक्रिया खोळंबली नाही, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.