करदात्यांप्रती सन्मान असावा, संवाद-सद्भाव आवश्यक; विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 09:18 PM2021-12-01T21:18:43+5:302021-12-01T21:20:39+5:30
Nagpur News आपण राष्ट्रनिर्माणात योगदानासह करदात्यांना कर भरण्यासाठी प्रेरणादेखील देऊ शकता, असे प्रतिपादन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
नागपूर : ‘आयआरएस’ अधिकाऱ्यांनी करदात्यांच्या मनातील भय दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी करदात्यांबद्दल सन्मान व सद्भावाची भावना ठेवायला हवी. करदात्यांसोबत सरळ व सहज भाषेत संवाद प्रस्थापित झाला पाहिजे. त्याचप्रमाणे करदाता स्वत:च्या मनाने व कुठल्याही दबावाशिवाय कर भरेल यावर भर द्यायला हवा. अधिकाऱ्यांनी नेहमी नैसर्गिक न्यायाचे पालन केले पाहिजे. यातून आपण राष्ट्रनिर्माणात योगदानासह करदात्यांना कर भरण्यासाठी प्रेरणादेखील देऊ शकता, असे प्रतिपादन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. मंगळवारी (दि. १) ‘एनएडीटी’मध्ये (नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) दर्डा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ‘एनएडीटी’च्या प्रधान महासंचालक (प्रशिक्षण) रुबी श्रीवास्तव, सहसंचालक तसेच ७४ व्या तुकडीचे अभ्यासक्रम संचालक ऋषीकुमार बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते. दर्डा यांनी व्याख्यानादरम्यान त्यांच्या संसदेच्या अनुभवांवर भाष्य केले. संसदेत पाऊल टाकल्यापासून ते कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक प्रश्न विचारले व विधेयके मांडली, असे त्यांनी सांगितले. संसदेत विचारण्यात आलेले प्रश्न व मांडलेल्या विधेयकांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी त्यांच्या कार्यक्षेत्रात सहायक आयकर आयुक्तपदी नेमले जातील. या दरम्यान, त्यांनी करदात्यांकडे नेहमी आदर भावनेने पाहिले पाहिजे. करदाता हे चोर नाहीत व ते गुलामदेखील नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी चांगली वर्तणूक असली पाहिजे. जर अशी वागणूक असली तर त्याचा निश्चितच फायदा होईल, असे दर्डा म्हणाले. संवादाचे महत्त्व मांडताना त्यांनी हिंदुस्तान लिव्हरमध्ये झालेल्या एका संपाचे उदाहरण दिले. प्रभावी संवादाच्या अभावामुळे संप सर्वाधिक काळ चालला, असे त्यांनी सांगितले.
‘फेसलेस ऑडिट’ प्रणालीमध्ये नैसर्गिक न्यायाचा अभाव आहे. कशा पद्धतीने कर लावल्या जात आहे, याचीच लोकांना माहिती कळत नाही. एक जण ‘ऑडिट’ करतो, दुसरा कर लावतो तर तिसरा आणखी काही करतो. अशी अनेक प्रकरणे सद्यस्थितीत न्यायालयात चालू आहेत. न्यायालयाने या प्रकरणांवर टिप्पणीदेखील केली आहे. ही प्रणाली चांगली आहे. मात्र, तिला वाईट बनविण्यात आले आहे. ज्यावेळी कुठल्याही गोष्टीला वाईट बनविण्यात येते, तेव्हा त्याचा दुरुपयोग करण्यात येतो. त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केला पाहिजे व नंतरच उपयोग करायला हवा, असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
यंत्रणेकडे तंत्रज्ञान आहे व त्याचा उपयोग केला पाहिजे. उपलब्ध असलेल्या सर्व डाटाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वाद झाल्याने वेळ वाया जातो व सोबतच कामदेखील वाढते. विवादातून संवादाकडे जाणे कधीही चांगलेच असते. जेव्हा वाद कमी होतात तेव्हा कामाचा दर्जा वाढतो. व्होडाफोन प्रकरणात ज्यावेळी त्यांना २० हजार कोटींचा कर लावण्यात आला, तेव्हा संसदेने यात कायदा संमत केला. केअर प्रकरणातदेखील ८ हजार कोटींचा कर लावण्यात आला होता. आतक्त्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर कर द्यावा लागेल. कोणताही निर्णय घेत असताना भेदभाव, रंग, राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर येत काम केले पाहिजे. आज जवळपास १० लाख कोटींचा महसूल मिळत आहे. यात १० टक्के लोक ९० टक्के कर देत आहेत. आता ९० टक्के उर्वरित लोकांना कराच्या मर्यादेत आणावे लागेल. यासाठी संवादाची तसेच लोकांमध्ये विश्वास जागविण्याची आवश्यकता आहे. यातून जो महसूल येईल तो देशाचा विकास व गरजूंच्या कामात येईल, असे दर्डा म्हणाले.
यावेळी विजय दर्डा यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना यशस्वितेचा मंत्रदेखील दिला. जेव्हा मनात संभ्रमाची स्थिती निर्माण होईल किंवा प्रचंड संताप येईल, तेव्हा कुठलाही निर्णय घेऊ नये. असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. मनात नेहमी सकारात्मक भावना व विचार ठेवले पाहिजेत. याचा फायदा निश्चितच मिळेल, असे त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी दर्डा यांना प्रश्न विचारले.
...तर तुमच्यासाठी काम करणे सोपे होईल
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकारी विविध राष्ट्रीय पातळ्यांवरील संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी जातात. तुम्हाला खासगी संस्था व संघटनांमध्येदेखील जायला हवे. तेथे गेल्यावर तेथील दबाव काय असतात व त्या परिस्थितीत कसे काम होते, कर देण्यात काय समस्या येतात, याची कल्पना येईल. खासगी क्षेत्रातील अडचणी जाणून घेतल्यानंतर काम करणे आणखी सोपे होईल, असे दर्डा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ‘लोकमत’मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. आमच्यावर बातम्यांचा किती दबाव असतो, हे तेथे आल्यावर कळेल, असे दर्डा म्हणाले.
प्रशिक्षणार्थी अधिकारी खरे राष्ट्रभक्त
यावेळी दर्डा यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना खरे राष्ट्रभक्त, असे संबोधले. माझ्यासाठी सीमेवर तैनात असलेला सैनिकदेखील राष्ट्रभक्त आहे, शेतकरीदेखील राष्ट्रभक्त आहे. स्वातंत्र्यसेनानींनंतर ‘आयआरएस’ अधिकारीच आहेत, जे देशाचा विकास, प्रगती व नागरिकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी कार्य करीत आहेत, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली.
वडिलांनी दिले निर्भयतेने बाजू मांडण्याचे संस्कार
संसद सदस्य म्हणून कार्य करीत असताना अनेकदा असे क्षण आले, ज्यावेळी मी निर्भयतेने माझी बाजू, मुद्दे व विचार मांडले. निर्भयतेचे हे संस्कार माझे वडील ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्यापासून मिळाले असल्याचे दर्डा यांनी सांगितले. माझे वडील जबलपूर येथील तुरुंगात कैदेत होते. त्यामुळे आजी मृत्युशय्येवर होती. त्यावेळी माझ्या काकांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांजवळ जाऊन वडिलांची सुटका करण्याची विनंती केली. जर त्यांनी माफीनामा लिहून दिला तर त्यांची सुटका करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु माझ्या वडिलांनी याला मंजुरीच दिली नाही, असे दर्डा यांनी सांगितले.