जोरदार ब्लास्ट झाला अन् अख्खे सोनेगाव निपाणी गावच हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 07:27 PM2023-04-24T19:27:20+5:302023-04-24T19:28:07+5:30

Nagpur News रोजच्याप्रमाणे हिंगणा एमआयडीसी परिसरातील सोनेगाव निपाणी गावात सोमवारी सकाळी लोक आपापल्या कामाला लागले होते. अचानकपणे साडेदहा वाजताच्या सुमारास जोरदार ब्लास्ट झाला. प्रचंड आवाजाने एक किलोमीटर परिसर हादरला.

There was a strong blast and the entire Sonegaon Nipani village shook | जोरदार ब्लास्ट झाला अन् अख्खे सोनेगाव निपाणी गावच हादरले

जोरदार ब्लास्ट झाला अन् अख्खे सोनेगाव निपाणी गावच हादरले

googlenewsNext

 

मंगेश व्यवहारे, विशाल महाकाळकर

नागपूर : रोजच्याप्रमाणे हिंगणा एमआयडीसी परिसरातील सोनेगाव निपाणी गावात सोमवारी सकाळी लोक आपापल्या कामाला लागले होते. अचानकपणे साडेदहा वाजताच्या सुमारास जोरदार ब्लास्ट झाला. प्रचंड आवाजाने एक किलोमीटर परिसर हादरला. ग्रामपंचायतीमध्ये बसलेले लोक बाहेर पडले तर कटारिया ॲग्रो प्रा. लि. कंपनीतून आगीच्या ज्वाळांनी आकाश व्यापून गेले. लगेच लोकांनी कंपनीकडे धाव घेतली. काहींनी पोलिसांना, काहींनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. कंपनीतून जोरजोरात किंकाळ्या ऐकू येत होत्या. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की कुणी आत जाण्याचे धाडस करत नव्हते. आग लागल्यानंतर अर्ध्या तासात अग्निशमन विभागाची वाहने दाखल झाले. त्यांनी मैदानाकडील भागातून पाणी मारण्यास सुरुवात केली. आग काहीशी आटोक्यात आल्यावर पथकातील कर्मचारी व परिसरातील लोक आत शिरले. तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. घटनास्थळी सापडलेले चारही मृतदेह कोळसा झाले होते. तर दोन जण जखमी आढळले, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

कटारिया ॲग्रो प्रा. लि. ही कंपनी सोनेगाव निपाणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून, ही कंपनी बायोमास फ्यूल पॅलेट प्रोडक्ट बनविते. त्यामुळे बायोमास फ्यूल पॅलेट बनविण्यासाठी आवश्यक ज्वलनशील पदार्थांचे रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात होते. या मटेरियलचा उपयोग करून यंत्राच्या साहाय्याने फ्यूल पॅलेट बनविण्यात येत होते. यात लाकडी भुशाचा उपयोग होत होता. सोमवारी पहिल्या शिफ्टचे कर्मचारी कामावर पोहोचले होते. ते साडेदहा वाजताच्या सुमारास काम करीत असतानाच ब्लास्ट झाला आणि कंपनीत असलेल्या भुशाने आग पकडली. आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड धूर कंपनीत झाला. कंपनीमध्ये एकच प्रवेशद्वार असल्याने काही मजुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. आगीच्या धुरामुळे ते तिथेच फसले आणि बेशुद्ध पडले. आग इतकी भीषण होती की त्यांनाही कवेत घेतले. अग्निशमन विभागाचे पथक पोहोचल्यानंतर तीन मजूर गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर तीन मजुरांच्या मृतदेहाचा कोळसा झालेला होता. त्यांना बाहेर काढून मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. हे सर्व मजूर परराज्यातील असल्याने घटनास्थळावर त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांचे पथकही घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी आग विझल्यानंतर पंचनामा सुरू केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी परिसरातील कामगार वर्ग व गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळावर पोहचले होते.

- आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या शिफ्टमध्ये १२ ते १३ लोक काम करीत होते. इलेक्ट्रिकच्या केबलमध्ये ब्लास्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत तीन लोकांचे मृतदेह आढळले तर तीन मजूर जखमी आढळून आले. त्यांना अमेरिकन ऑन्कॉलॉजीमध्ये उपचारासाठी पाठविले आहे.

-आशिष वानखेडे, तहसीलदार, नागपूर ग्रामीण

 

- सकाळी ११.१५ ला कॉल आला. तिथे आम्ही पोहोचल्यावर ४ माणसे अडकली, अशी माहिती मिळाली. आम्ही लोखंडी पत्रे काढून पाणी मारणे सुरू केले. अडकलेल्या माणसांचा शोध घेत असताना तीन मृतदेह आढळले. मृतदेह मेडिकलमध्ये पाठविले. कंपनीत भरपूर रॉ मटेरियल असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत ते बाहेर काढणे सुरू होते. कंपनीत अग्निशमन उपकरणे होती. पण मेन्टेनन्स नसल्याने उपयोग नव्हता. आग विझविण्यासाठी १५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या.

-आनंद परब, अग्निशमन अधिकारी, एमआयडीसी

- कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ज्वलनशील पदार्थ येथे बनत असतानाही येथे आग विझविण्यासाठी कुठलीही उपकरणे नव्हती. घटना घडताच आम्ही लगेच पोहोचलो. आगीची भीषणता भरपूर होती. त्यामुळे लोकांना वाचवू शकलो नाही.

-विनोद लंगोटे, सदस्य, ग्रा. पं. सोनेगाव निपाणी

Web Title: There was a strong blast and the entire Sonegaon Nipani village shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट